नसरापूर: भोर तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला गटविकास अधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या फिर्यादीनुसार लहान बालिकांचे लैंगिक शोषण (पॉस्को) कायद्याअंतर्गत शिक्षकावर राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा परिषद शाळेत मुलींचे हिमोग्लोबीन तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्यावेळी शिबिरासाठी आलेल्या स्वयंसेविकांनी मुलींना गुड टच आणि बॅड टच याबाबत माहिती दिली. त्यानंतर काही मुलींनी शिक्षक हे आपल्याला बॅड टच करत असतात, अशी तक्रार केली. याबाबत सात मुलींनी त्यांच्या पालकांना माहिती दिल्यावर ५ मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आला.
त्यानंतर पालकांनी शिक्षकास या घटनेचा जाब विचारून चोप दिला आणि पंचायत समिती शिक्षण विभागाकडे तक्रार केली. भोरचे गटविकास अधिकाऱ्यांनी महिला शिक्षकांची चौकशी समिती नेमून झालेल्या प्रकाराची शहानिशा करून शिक्षकास तातडीने निलंबित केले.
राजगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी यांनी या प्रकरणी गांभिर्याने दखल घेत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना बोलावून या घटनेबाबत पोलिस ठाण्यात तक्रार का दाखल केली नाही? याचा जाब विचारत त्यांची तक्रार घेतली. या गुन्ह्यातील शिक्षक फरारी असून, किकवी पोलिस चौकीचे फौजदार अजित पाटील पुढील तपास करत आहेत.
हे प्रकरण समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार होणाऱ्या घटनांवर तातडीने लक्ष देण्याची आणि आरोपींना कठोर शिक्षा होण्याची गरज आहे.