नसरापूर – भोर तालुक्यातील निगडे गावात शनिवारी (२ ऑगस्ट) दुपारी गावच्या सध्याच्या सरपंच नाजुका बारणे यांचे पती किशोर लक्ष्मण बारणे यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाला. गावाच्या मुख्य रस्त्यावर भरदिवसा झालेल्या या घटनेने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, “या हल्ल्यामागे नेमकं कोण?” हा सवाल सर्वत्र उपस्थित होत आहे. स्थानिकांमध्ये या घटनेमागे राजकीय वैरभाव असल्याच्या चर्चाही वेग घेत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, दुपारी १ वाजण्याच्या सुमारास किशोर बारणे हे कारने घरी जात असताना, हायवे ते गावाच्या मुख्य रस्त्यावर शिवाजी चौधरी यांच्या घराजवळ प्रथमेश ज्ञानेश्वर चिकणे व त्याचे वडील ज्ञानेश्वर आनंदा चिकणे (दोघेही रा. निगडे) हे दुचाकीवरून आले. त्यांनी अचानक बारणे यांच्या कारजवळ थांबून, कोणतीही पूर्ववैमनस्यता नसताना लोखंडी कोयता कारवर फेकून मारला.
बारणे यांनी जाब विचारताच, वडील-मुलगा दोघांनीही उघड्यावर संतापाने अश्लील शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच थांबता ज्ञानेश्वर चिकणे याने पुन्हा हातातील कोयता बारणे यांच्या दिशेने फेकला; सुदैवाने तो अंगावर न लागता खाली पडल्याने मोठी दुर्घटना टळली.
या धक्कादायक घटनेनंतर बारणे यांनी थेट राजगड पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलिसांनी तत्काळ गंभीर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार नाना मदने करत आहेत. मात्र हल्ल्यामागील खरा सूत्रधार कोण, हल्ल्याचा उद्देश काय आणि आरोपींना पाठबळ देणारे कोण – हे प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहेत.
राजकीय वैरभाव की वैयक्तिक राग? गावात चर्चा तापली
गावात या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिक “हे फक्त प्रकरण नसून, यामागे कुणीतरी मोठा राजकीय ‘आका’ आहे” असा आरोप करत आहेत. निवडणूक जवळ आल्याने राजकीय शत्रुत्वाची पार्श्वभूमी या हल्ल्यामागे असल्याचा संशय गावकऱ्यांत व्यक्त होत आहे.
भरदिवसा गावात अशा प्रकारे गुंडांनी उच्छाद मांडणे, हा पोलिसांच्या गस्त आणि गुप्तचर यंत्रणेवर मोठा प्रश्नचिन्ह आहे. “गुंड उघड्यावर हिंडतायत, हल्ले करतायत, आणि पोलिस फक्त गुन्हा नोंदवून थांबलेत?” असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. नागरिकांनी आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाईची मागणी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.