नसरापूर: पुणे-सातारा महामार्गाची (Pune-Satara Highway) दूरवस्था तसेच राजरोसपणे टोल वसूल करणाऱ्या महामार्ग प्राधिकरण व टोल प्रशासनाचा आज खेड शिवापूर टोल नाक्यावर (Khed Shivapur Toll Plaza) बंद आंदोलन करून जोरदार निषेध करण्यात आला. यावेळी महामार्गाची दुरुस्ती झालीच पाहिजे, खेड-शिवापूर टोल बंद झालाच पाहिजे, अशा घोषणा देत टोल नाक्यावरून जाणारी सर्व वाहने मोफत सोडून देत टोलनाका वसूली जोपर्यंत थांबवत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा काँग्रेस (Congress) पक्षाच्या वतीने घेण्यात आला होता. सदरचे आंदोलन भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या नेत्वृवाखाली करण्यात आले. अखेर त्यांच्या आंदोलनला यश आले असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाने लेखी आवश्वासन देत मागण्या मान्य केल्या आहेत. मागण्या मान्य होताच आंदोलन स्थगित करण्यात आले.
पुणे-सातारा महामार्गाची दयनीय अवस्था झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेवाडी ते कोल्हापूरपर्यंत विविध टोलनाक्यावर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. खेडशिवापूर (ता. हवेली) येथील टोलनाक्यावर भोरचे आमदार संग्राम थोपटे व पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप, देविदास भन्साळी, श्रीरंग चव्हाण पाटील, संग्राम मोहोळ, शिवाजी जांभूळकर, शैलेश सोनवणे, गंगाराम मातेरे, नाना राऊत, विठ्ठल आवाळे, धनंजय वाडकर, दिनकर धरपाळे, दिनकर सरपाले, शिवराज शेंडकर, नितीन दामगुडे, संदीप साठे, राहुल मते, प्रदीप अण्णा पोमण, सुनील निकाळजे, लहूनाना शेलार, रोहन बाठे, पोपटराव सुके, के.डी.भाऊ सोनवणे, लहू अण्णा निवगणे, राहुल जाधव, महेश टापरे, महेश ढमढेरे यांच्यासह पुणे जिल्हा काँग्रेस व भोर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जोपर्यंत लेखी हमी नाही, तोर्यंत मागे हटणार नाहीः आ. संग्राम थोपटे
खेड-शिवापूर टोलनाक्यावर आंदोलन करण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांची मोठी फौज जमा झाली होती. प्रथम सातारा बाजूकडील टोलवर आंदोलन करून सर्व वाहने मोफत सोडून देण्यात आली. त्यानंतर मुख्य टोलनाक्यावर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. यावेळी आमदार संग्राम थोपटे यांनी रस्ता धड नाही, तर टोल घेताच कशाला असा संतप्त सवाल करीत जोपर्यंत लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत कोणताही कार्यकर्ता हटणार नसल्याचीआक्रमक भूमिका घेतली.
आंदोलन स्थळी मोठा पोलीस फौजा फाटा
पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी देखील यावेळी येथील स्थानिक जनतेच्या पाठीशी कायम राहणार असून टोल नाका बंदच केला पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करून पुणे-सातारा महामार्गाच्या दयनीय अवस्थेबाबत संताप व्यक्त केला. रस्ता दुरुस्तीची लेखी हमी दिली तरी रस्ता दुरुस्त होईपर्यंत टोल वसूली बंदच ठेवावी लागेल, अशी आग्रही भूमिका या वेळी आमदार थोपटे यांनी मांडली. त्यामुळे टोल प्रशासन व महामार्ग प्राधिकरणापुढे पेच निर्माण झाला. सकाळी दहा वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी दोन वाजले तरी सुरूच होते. दरम्यान, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी राजगड पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
लेखी आश्वासन मिळताच आंदोलन स्थगित
आंदोलनामुळे कायदा-सुवव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो, यामुळे राष्ट्रीय प्राधिकनाने लेखी पत्र देत विविध मागण्या मान्य केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने या राष्ट्रीय महामार्गावर मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्याची दूरर्दशा झालेली आहे. यामुळे पुढील २४ तासांत खड्डे बुजविण्याचे काम सुरू करून येत्या ८ दिवसांमध्ये काम पुर्ण करण्यात येईल. सेवा रस्त्यावर पुन्हा डांबरीकरण करण्यात येईल. टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांचे पुन्हा पोलीस पडताळणी करण्यात येईल. आदी मागण्या मान्य करीत सदर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात येईल, असे लेखी आश्वासन मिळताच आंदोलन स्थगित करण्यात आले.