शिक्रापूर/शेरखान शेखः
केंदुर येथे एका नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. मात्र, आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली होती, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत होता. अखेर या आत्महत्येचे गूढ पोलिसांनी अवघ्या तासांमध्ये उकलले आहे. येथील एका युवकाचा प्रेमविवाह झाल्यानंतर त्याने पत्नीला दिलेल्या त्रासाने पत्नीने प्रेम विवाहानंतर चारच महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विशाल बबन साकोरे याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंदूर येथील पाचवड वस्ती येथे राहणाऱ्या विशाल साकोरे याचा प्रेमविवाह मे २०२४ मध्ये झाला होता. त्यांनतर विशाल वारंवार पत्नीच्या वडिलांकडे कामासाठी पैसे मागत होता. तसेच घरातील वादातून पत्नीला मारहाण करत होता. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याच्या पत्नीने ४ सप्टेबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
सदर घटनेचा तपास पोलिसांनाकडून करण्यात येत होता. या प्रकरणी नवविवाहितेचे वडीलांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्याने पोलिसांनी विवाहितेचा पती विशाल बबन साकोरे रा. पाचवड केंदूर ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहे.