भोर : भोर तालुक्यातील कामथडी पंचायत समिती गणातून सामाजिक कार्यकर्त्या मोनिका दशरथ जाधव यांनी पंचायत समिती निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला त्यांच्या उमेदवारीमुळे गणात राजकीय वातावरण तापले गेले. एकंदरीत उद्या होणाऱ्या मतदानात त्या गेल्या अनेक वर्षांत त्यांनी राबवलेल्या भरीव सामाजिक उपक्रमांमुळे जनतेचा त्यांच्यावर विश्वास दृढ झाला असून, याच विश्वासाच्या जोरावर त्या निवडणूक आघाडी घेतील असे देखील बोलले जात आहे.
पती दशरथ जाधव यांनी समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. राज्यस्तरीय अंध मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून त्यांनी दिव्यांग खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. भारती हॉस्पिटल ब्लड बँकेच्या माध्यमातून पाच वेळा भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करून त्यांनी अनेकांचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका बजावली. कोरोना काळात कोरोना योद्ध्यांचा सन्मान सोहळा आयोजित करून त्यांनी समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
युवकांसाठी नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून रोजगार मेळावे आयोजित करून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. विविध शाळांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम, शालेय विद्यार्थिनींसाठी तायक्वांदोद्वारे स्वसंरक्षण प्रशिक्षण, आदिवासी मुलांना अन्नवाटप असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले. स्व. शाहीर दादा कोंडके चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चार वेळा कबड्डी स्पर्धा तसेच पुणे जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या सहकार्याने दोन वेळा बॉडी बिल्डिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
विकासकामांच्या बाबतीतही मोनिका जाधव यांनी ठोस कामगिरी केली आहे. कासुर्डी गुंजन (मावळ) येथे दहा लाखांचे काँक्रिटीकरण, कोळवडी येथे स्मशानभूमीसाठी साडेदहा लाखांचा निधी, आळंदे येथे दहा लाखांचा रस्ता, लक्ष्मी माता मंदिर ते गणेश मंदिर काँक्रिटीकरणासाठी साडेदहा लाख, आळंदे प्राथमिक शाळेत तीन लाखांचे ओपन जिम, तसेच मातोश्री पाणंद योजनेअंतर्गत आळंदे येथे २३ लाख रुपये मंजूर करून आणले आहेत. धरण क्षेत्रातील ‘लय भारी गाव’ येथे केशर आंब्याच्या रोपांचे वाटप करून फळबागांना प्रोत्साहन दिले.
दरम्यान, कार्यरत पक्षाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता उमेदवारी डावलण्यात आल्याने अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली असली, तरी या अन्यायाला मतदारच मतांच्या माध्यमातून न्याय देतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कामथडी गणात त्यांच्या उमेदवारीकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात असून, जनतेचा विश्वासच त्यांच्या विजयाचा कणा ठरेल, अशी चर्चा सध्या रंगली आहे.















