जेजुरीः नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व मार्तंड देवसंस्थानचे माजी विश्वस्तांनी देवसंस्थानचे ट्रस्टी मनमानी पद्धतीने कारभार करीत असून, ट्रस्टीमधील काही व्यक्ती भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीच्यावेळी देवसंस्थानच्या भक्तनिवासमध्ये भाजपच्या वतीने राजकीय बैठका घेतल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या सर्व आरोपांचे खंडन जेजुरी शहर भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.
यासंबधी पत्रकार परिषद घेत शहर भाजपाने हे सर्व आरोप बिनबुडाचे असून, या प्रकरणी त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर ते त्यांनी द्यावेत, असे म्हटले आहे. अशा प्रकारचे आरोप भाजपवर करण्यात येत असतील, तर भविष्यात याविषयी तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.
या प्रकरणी जेजुरी शहर भाजप कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जेजुरी शहर अध्यक्ष गणेश भोसले, ओबीसी मोर्चा अध्यक्ष शिवदास झगडे, सरचिटणीस विक्रम माळवदकर, कल्पेश सूर्यवंशी तसेच महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शहर भाजपचे अध्यक्ष गणेश भोसले यांनी मा. नगरसेवक हेमंत सोनवणे आणि मा. विश्वस्त पंकज निकुडे यांनी भाजप पक्षाच्या राजकीय बैठका देवसंस्थानच्या भक्तीनिवासमध्ये झाल्या असल्याचा आरोप केला होता. हा आरोप पूर्णपणे चुकीचा असून, यात काहीही तथ्य नसल्याचे भोसले यांनी म्हटले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वीच शहरात भाजप पक्षाचे स्वतंत्र कार्यालय आहे. यामुळे भक्तीनिवास या ठिकाणी राजकीय बैठक घेण्याचा प्रश्नच उपस्थित राहत नसल्याचे भोसले यांनी सांगितले. तसेच जाणूनबुजून भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.