पारगांव: (प्रतिनिधी धनाजी ताकवणे)
दौंड तालुक्यातील पारगांव गावच्या ग्रामस्थांच्या सहकार्याने रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पारगाव व कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन नव्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. तसेच शाळेसाठी ११ एकराची प्रशस्त जागा उपलब्ध झाली आहे. शाळेच्या शैक्षणिक क्षेत्रात काही बदल घडत असतात. यासाठी अनेक कामे निघत असतात. याच शाळेच्या जुन्या इमारतीचा रंग खराब झाला होता. यामुळे रंगकाम करण्याची आवश्यकता होती, यासाठी रंगकामाचा खर्च जास्त येत असल्याने इमारतीच्या रंगकामासाठीची आर्थिक खर्च वाचविण्यासाठी शाळेच्या शिक्षकांनी रंगकाम हाती घेत एक स्तुत्य उपक्रम केला आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे शिक्षकांचे कौतुक होत आहे.
या वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना प्रसन्न वाटावे हा रेंगाळत असलेला प्रश्न शाळेतील सात-आठ शिक्षकांनी एकत्र येत हे काम हाती घेऊन शाळेचा रंग मजुरीसाठीचा जवळपास ५० हजार रुपयांचा खर्च वाचवला आहे. विध्यार्थ्यांना प्रसन्न वातावरणात शिक्षण मिळावे यासाठी विद्यालयातील शिक्षकांनी स्वतः रंग देण्याचे ठरवले. सुट्टीच्या कालावधील रात्री उशिरा पर्यंत काम करून फक्त दोन दिवसामध्ये आठ खोल्यांना रंग देण्याचे काम पूर्ण केले. विष्णू शिंदे, संतोष भालेराव, प्रकाश लोहकरे, जनार्दन लोणकर, अर्जुन वाबळे, गोरख जाधव, ज्ञानदेव झगडे, कृष्णा वळवी आणि रामदास भोईटे या शिक्षकांनी शाळेचे मुख्याध्यापक जयराम सवाने आणि स्कूल कमिटी यांचे मार्गदर्शन घेऊन हे काम स्वयंप्रेरणेने पूर्ण केले.
यासाठी काही विद्यार्थ्यी देखील सहभागी झाले होते. या अनोख्या शिक्षकांच्या श्रमदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेचे मुख्याध्यापक जयराम सवाने यांनी या शिक्षकांच्या कामाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करता आले याचे एक आत्मिक समाधान मिळाले असल्याचे शिक्षक जनार्धन लोणकर यांनी सांगितले.