भोरः भाग ४
भोर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या नागरिकांना भडसवणाऱ्या समस्येपैकी रस्त्याची समस्या देखील मोठी मानली जाते. या ठिकणी रस्ते आहेत, मात्र ठिकठिकाणी खड्डे पडलेले….त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचते. मूळात या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पावसाचे पाणी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात साचून राहते. तसे पाहिले तर या ठिकाणच्या रस्त्यांचा दर्जा वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. तसे होताना कुठेही दिसत नाही. उलट जे रस्ते आहेत, त्यावर त्यातपुरती मलमपट्टी केली जाते. पुन्हा वर्षाभरात रस्ता उखडतो आणि परिस्थिती जैसे थेच राहते. बरं यात कमी काय म्हणून एकाच ठेकेदाराला निधीची तरतूद करुन रस्त्याची कामे दिली जातात. एकाच रस्त्यासाठी सारखा निधी दिला जातो, असे देखील या भागात राहणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रश्नाला घेऊन सत्ताधारी व विरोधक आंदोलन करतात. प्रश्न तसाच राहतो. मग पाणी मुरतयं कुठं? असा प्रश्न या रस्त्याच्या प्रश्नाला घेऊन उभा राहिलेला आहे.
पुणे-सातारा महामार्गावर देखील ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पाहिला मिळत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहे. या अपघातांमध्ये अनेकांनी आपला प्राण गमावला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. खड्डेमुक्त महामार्ग तसेच टोल संदर्भात आंदोलन देखील करण्यात आले होते. मात्र, खड्डे तशेच आहेत आणि टोल वसूली देखील सुरू आहे. मग त्यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनांच काय झालं? मतांच्या राजकारणासाठी आंदोलन छेडण्यात आले होते का? आंदोलन नावापुरतेच होते का? हे आणि असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. सारोळा-वीर, चेलाडी-वेल्हा वीसगाव खोऱ्यातील रस्ते आदी भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुर्देशा झाली असून, याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असे म्हणण्याची वेळी इथल्या नागरिकांवर आलेली आहे.
वेल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरावस्था
निसर्गाच्या सानिध्यात वेल्हा वसलेलं आहे. मात्र, इथल्या रस्त्यांची परिस्थिती दयनीय आहे. इथल्या रस्त्यांची दुर्देशा पाहता ‘निसर्गाच्या सानिध्यात’ एवढाच उल्लेख करण्यापुरता वेल्ह्याचा भाग आहे का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ला देखील या ठिकाणी आहेत, परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी देखील रस्ता व्यवस्थित नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. या भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेले रस्ते पुढीलप्रमाणेः नसरापूर ते करांजावने, विंझर ते लाशिर्गाव, पाबे ते वेल्हा, बठ्ठी जाधव वाडी खरीव ते बाझेगर – साखर गुंजवणे ते कासूर्डी कुसागाव खिंड रोड वेल्हा ते पानशेत कादवे खिंड मार्ग शिर्केवाडी ते शिरकोली पासली फाटा ते गुहिनीपर्यंतचे रस्ते खराब झालेले आहेत. यावर गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. मतदारांच्या हातात उमेदवाराला निवडून देण्याची ‘मास्टर की ‘आहे, आता तेच ठरवतील आपला लोकप्रतिनिधी कोण?