भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस बरसताना दिसत आहे अशातच भोर तालुक्यात मंगळवार (दि९) रात्री पहाटेपासून ढगाळ हवामानासह रिमझिम पाऊस पडला .पहाटे अचानक पाऊस आल्याने शेक-यांची दैना झाली . जनावरांचा वाळलेला चारा भिजला. गहू , हरभरा, ज्वारी, घेवडा, पावटा, कांदा, भुईमूग, वाटाणा अशा रब्बी पिकांवर खराब हवामानामुळे किडीचा, रोगाचा प्रादुर्भाव पडण्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात जळनाची साधन सामुग्री (सरपण,फाटे, शेणीच्या गव-या) अचानक आलेल्या पावसाने भिजले . पुढे उन्हाळ्यात साठवून ठेवण्याचा जनावरांचा चारा भिजल्याने केलेल्या कष्टाचे चीज झाले नाही अशा शब्दांत शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली.
थंडीत अचानक पाऊस आल्याने ढगाळ हवामान झाले तसेच हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे त्यामुळे अशा खराब हवामानामुळे सर्दी , खोकला, ताप,थंडी, अंगदुखी, डोकेदुखी, कणकण असे साथीच्या आजारी रुग्णात वेगाने वाढ झाली असून दवाखान्यातुन गर्दी पहायला मिळत आहे.संवेदनशील आजारी रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे
तालुक्यातील वीसगाव खोरे मांढरदेव रस्ता, भोरमार्गे कापूरव्होळ पुणे रस्ता , रामबाग रस्ता या मार्गावरील रस्त्याची कामे ही मोठ्या प्रमाणावर सुरू असुन अचानक पाऊस पडल्याने रस्ता चिखलमय निसरडा झाला आहे. ब-याच ठिकाणी दुचाकी वाहने घसरून छोटे मोठे अपघात झाले.तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने तरूण वर्ग रोजगारासाठी बाहेरगावी दुचाकी वाहनावरून ये जा करत आहेत त्यामुळे संबधित विभागाने वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन तरुणांना केले आहे.