भोरः भाग ३
पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं शहर म्हणजे भोर. ब्रिटीश काळापासून या शहराला खूप महत्व आहे. थोडक्यात पुरात्तन वास्तूंचा ठेवा आजही या ठिकाणी आपल्याला पाहिला मिळतो. तसेच राजगड आणि रोहिडा हे किल्ले, भाटघर धरण हे याच भूमित आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक शहरांचा काळापर्त्वे विकास होत गेला. रोजगारांच्या संधी तरुणांसाठी उपलब्ध होत गेल्या. पर्यटनाचा विकास आणि चालना मिळत गेली. मात्र, या साऱ्यात भोर-वेल्हा-मुळशी यातील भोर-वेल्हा हा भाग दुर्लक्षिला गेला, तर काही प्रमाणात मुळशी तालुक्याचा विकास झाला. भोरचा विकास खुंटण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे इथल्या नागरिकांना निवडणुका आल्या की, आश्वासनांचे गाजर दाखविले जाते. पण त्या आश्वासनांची पूर्तता कोणाकडूनही केली जात नाही. त्यामुळे उमेदवार निवडणुकीच्या वेळी प्रलंबित प्रश्नांवर मोठमोठी भाषणं ठोकून मोकळे होतात. तसेच इथल्या जनतेला अंधारात ठेवून सत्ताधारी आणि विरोधकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. आश्वासनांचे गाजर दाखवून विकासपासून वंचित ठेवले जात आहे. इथला मतदारराजा आपल्या प्रश्नांची सोडवणूक कोणी तरी करेल ही आशा मनाशी बाळगून वाट पाहतात…..असे चित्र गेल्या अनेक वर्षांपासूनचे आहे.
भोर तालुक्यातील गावांना ये-जा करण्यासाठी दळणवळणासाठी साधन म्हणून एसटी बस सेवा उपलब्ध आहे. पण नागरिकांना अनेक असुविधांचा सामना आजही करावा लागत आहे. भोरच्या बसस्थानक हे दुरावस्था दर्शविणारे सर्वात पहिले उदाहरण आहे. त्यामुळे भोरला बसस्थानक नसून घाणीचे साम्राज्य असल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. निवडणुका आल्या की, एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करण्यात उमेदवार दंग असतात. मात्र, भोळी भाबडी जनता यांच्या भांडणात आश्वासनांवर समाधान मानून बसस्थानक आज-उद्या सुधारेल ही आशा लावून बसतात. बसस्थानक खड्ड्यांचे साम्राज्य, चिखल, कचरा, दुर्गंधी व अस्वच्छतेचे ठिकाण बनलेले आहे.
अपू-या बसेस, प्रवासावेळी प्रवासात बंद पडणा-या जुन्या निकृष्ट झालेल्या बसेस, कर्मचाऱ्यांचा अभाव, वाडी वस्त्यांवर वेळेवर न जाणा-या बसेस, दररोज विद्यार्थ्यांचे होणारे हाल, महिला, जेष्ठ नागरिकांचे होणारी फरपट,असुरक्षितता, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचा अभाव, या अशा अनेक प्रश्नांचा विळखा तालुक्याला आहे. बसस्थानकाबाबत नागरिकांवर नेहमीच भेडसावण्याची वेळ येत आहे. तसेच वेल्हा तालुका हा खरंतर निसर्गाच्या सानिध्यात असणारा तालुका आहे. तालुका असून देखील येथे बसस्थानक नाही. यामुळे इथल्या नागरिकांची हेळसांड होताना पाहिला मिळत आहे. त्यामानाने मुळशी तालुक्यात सुधारणा झाली असून, तसेच त्या ठिकाणी आयटीपार्क असल्याने तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध आहे. आता काही दिवसांवर निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे प्रामुख्याने युवावर्गाचा रोष नेते मंडळींवर असून, ही निवडणूक त्यांनी हातात घेतल्यास त्याचा मोठा फटका नेते मंडळींना बसणार आहे.