पारगांवः धनाजी ताकवणे
दौंड तालुक्यात विधानसभा निवडणूक प्रचाराचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात अशी हायहोल्टेज लढत येथे पाहिला मिळणार आहे. आरोप प्रत्यारोपाच्या शाब्दिक चकमक सुरू होऊ लागण्याने दौंड तालुक्यातील मतदार राजा आता काय निर्णय घेतो यावर ही निवडणूक आधारलेली आहे. विधानसभेच्या निवडणुका जाहीर होताच अनेक दिग्गजांकडून आपल्या उमेदवारीचे अर्ज दाखल करण्यात आले. दौंड तालुक्यातील पारंपारिक प्रतीद्वध्वी पुन्हा आमने सामने लढतानाचे चित्र पाहिला मिळणार आहे.
दौंड तालुक्यातील तिसरा पर्याय बादशहा शेख, विरधवल जगदाळे यांनी आज दि. ४ नोव्हेंबर रोजी माघार घेतल्याने तालुक्यातील तिसऱ्या पर्यायाची आशा मावळली असून आता राहुल (दादा) आणि रमेश (आप्पा)असाच झुंझार सामना रंगणार आहे. महायुतीतील भाजपकडून राहुल कुल यांनी दौंड विधानसभेचा जोरदार शक्तिप्रदर्शन करत निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्यक्ष गाव भेट दौरे सुरू करुन मतदारांपर्यंत भाजपला मतदान करुन विजयी करावे, असे आवाहन राहुल कुल यांच्याकडून करण्यात येत आहे.
अजित पवार गटातील रमेश थोरात यांनी शरद पवार गटात जाहीर प्रवेश करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करून तुतारी चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. तर मागील लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटात अनेक निष्ठवंतांनी काम केले आहे, यात आप्पासाहेब पवार यांना दौंड विधानसभेची उमेदवारी मिळणार हे निश्चित असल्याचे स्पष्ट होते. परंतु ऐन विधानसभेला निष्ठवंतांना डावलून रमेश थोरात यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवार गटातील निष्ठवंतांच्यात अस्वस्थता पसरली असल्याचेही तालुक्याने पाहिले आहे.
तालुक्यातून रमेश थोरात यांनी आपली भूमिका मांडताना लोकसभेला आपली मोठी चूक झाली आणि शरद पवार आमचे दैवतच आहेत. पक्षात प्रवेश मिळवत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करून आपल्या प्रचाराची रणधुमाळी सुरू करून जनतेची सेवा करायची आहे, म्हणत मतदारांपर्यंत पोहचत आहेत. पारगांव येथे दि. २ नोव्हेंबर रोजी भाजपचे राहुल कुल आणि दि. ३ नोव्हेंबर रोजी शरद पवार गटाचे रमेश थोरात यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. दौंड तालुक्यातील राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात असाच चुरशीच हायहोल्टेज सामना रंगणार तिसरा पर्याय नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.