राजगडः येथील २८ कोटींच्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाला बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली उपस्थिती दर्शवत या विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या पाठपुराव्यामुळे झालेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी बारामती लोकसभा निवडणूकीची खरी सुरुवात संग्राम थोपटेंच्या भोरमधील हरीशचांद्री येथे झालेल्या विराट सभेपासून झाली होती, अशी आठवण त्यांनी सांगितली.
तसेच मी महाविकास आघाडीच्या वतीने शब्द देते की, ही सीट कष्टाची परिकाष्टा करु पण काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणू असा विश्वास सुळे यांनी व्यक्त केला. जर काँग्रेस पक्षाने आम्हाला येथील सीटबद्दल विचारणा केली तर आम्ही त्यांना सांगू, भोरमध्ये एकच वादा ‘संग्राम दादा’. आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी केवळ ६० दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी आता कामाला लागा असे आवाहन त्यांनी केले.
संग्रामदादा यांच्या कामामध्ये सातत्य आहे, जर काही प्रश्न असतील तर ते आम्ही दोघे मिळून सोडवू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आधी टार्गेट मी होते आणि आता संग्राम थोपटे तुम्ही टार्गेट आहात, जेवढे जास्त टार्गेट होताल तेवढी जास्त मते मिळतील असा ठाम विश्वास सुळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
तसेच महाविकास आघाडीच्या वतीने शब्द देते, की काँग्रेचा उमेदवार ठरवायचा अधिकारकार त्यांना आहे. त्यांच्या उमेदवारासाठी काम करून लोकसभेपेक्षा जास्त लीड देऊ आणि आमच्याकडून या मतदार संघातून संग्राम थोपटे यांचे नाव असेल एकप्रकारे त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे सुप्रिया सुळे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
महाविकास आघाडीत ज्याचे सीटिंग सीट, त्यांचा उमेदवार हा फॉर्मुला ठरलेला असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी बोलताना दिले. दोनच महिन्यांचा विषय आहे, एकदा आमचे सरकार आल्यावर तुम्हाला कुठलीही गोष्ट कमी पडू देणारं नसल्याचे सुळे यांनी सांगितले.