भोर, प्रतिनिधी : विद्या प्रतिष्ठानच्या डॉ. सायरस पूनावाला स्कूल (CBSE), बारामती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “सायबर स्पार्क २०२६” या आंतरसंस्थात्मक संगणक स्पर्धेत विद्या प्रतिष्ठानच्या भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत शिवेंद्र सूरज महाडिक व शिवम चित्तरंजन रांगोळे यांनी स्क्रॅच प्रोग्रामिंग स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदविला. तर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धेत अरिबा इम्रान अत्तार व आराध्या प्रवीण धोत्रे यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच HTML वेबपेज डिझायनिंग स्पर्धेत अनुष्का सचिन घोणे हिने आपल्या तांत्रिक कौशल्याच्या जोरावर तृतीय क्रमांक मिळवित विशेष कामगिरी केली. विजेत्या विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील सर्व सादरीकरणांचे परीक्षण स्वतंत्र परीक्षक मंडळामार्फत स्पर्धेच्या नियमावलीनुसार करण्यात आले. मूल्यांकन प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने पार पडली.
मुख्याध्यापिका अश्विनी संतोष मादगुडे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली तसेच संगणक शिक्षक फिरदोस फरीद अत्तार यांच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने स्पर्धेत सहभाग घेत हे यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये पालकांचेही मोलाचे योगदान लाभले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांची ही कामगिरी संगणक विषयातील दर्जेदार अध्यापन व तांत्रिक ज्ञानाचा उत्कृष्ट नमुना ठरली आहे.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










