नसरापूर : जांभळी गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरक्षा व्यवस्थेसाठी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी होमगार्ड असलेल्या विलास रोहीदास गायकवाड उर्फ मुंगळ्या (रा. जांभळी) याच्यावर राजगड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी उपसरपंच शिवाजी गेणबा कोळपे (वय ६३) यांनी दिलेल्या माहितीवरून, दि. २१ मार्च रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपीने ग्रामपंचायतीच्या कॅमेऱ्यांची दगड व काठीने तोडफोड केली. याआधीही आरोपीने ग्रामपंचायतीच्या काचा आणि दरवाज्यांचे नुकसान केल्याची तक्रार दाखल आहे.
दरम्यान, जांभळी गावात मागील काही काळात चोऱ्या, छेडछाड व दमदाटीचे प्रकार वाढले असून, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी संबंधित प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे.