पहिल्याच दिवशी तालुक्यात लहान मुले -थोरामोठ्यांसह, शिवभक्त, धारकरी,शिवपाईक ,सेवेक-यांचा उस्फुर्त प्रतिसाद
भोर :- सध्या तालुक्यात घटस्थापना होऊन,शारदीय नवरात्रौत्सव सुरू झाला असुन सर्वत्र गावा गावातुन, खेड्यापाड्यात,वाडी वस्तीवर पहाटेच्या पहरी सुर्योदयापुर्वी व सायंकाळी सुर्यास्तानंतर श्री दुर्गामाता दौडने देवीचा जागर करून जागर देशभक्तीचा व गोंधळ राष्ट्रभक्तीचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भोर विभागाच्या वतीने तालुक्यातील सर्व धारकरी,शिवपाईक व सेवेकरी यांच्यावतीने साजरा केला जात आहे. पहिल्याच दिवशी तालुक्यात लहान मुले -थोरामोठ्यांसह, शिवभक्त, धारकरी, शिवपाईक , सेवेक-यांचा या दुर्गामाता दौडला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
तालुक्यातील शिव छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या जन्मभूमीत म्हणजेच शिंद (ता.भोर ) या गावात दरवर्षी श्री दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते. यामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,श्री वीर बाजीप्रभू प्रतिष्ठान कसबे शिंद आणि गुरुकुलधाम शिंद संघटनेचे वारकरी धारकरी पहिल्या दिवशी या दुर्गामाता दौड मध्ये सहभागी झाले होते. यावेळी वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या मुर्तींचीही पूजा करण्यात आली.आज घटस्थापनेपासून या दौडला प्रारंभ होत असतो आणि विजयादशमी दस-या दिवशी या दौडीची सांगता होत असते. देव, देश, धर्मासाठी काम करण्याची इच्छा,आकांक्षा, लढाऊपणा आजच्या तरुण पिढीत यावा , हिमालय,काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हिंदुस्थान अखंड राहावा, यासाठी तरुणांनी भगव्या ध्वजाच्या नेतृत्वात दुर्गामाता, भारतमाता व या देशासाठी, धर्मासाठी जे शुरवीर धारातीर्थी पडले त्यांचा जयघोष करत तरुण प्रभातफेरी काढत असतात. ज्याप्रमाणे राजमाता जिजाऊ, शिवछत्रपती शिवराय व संभाजी महाराजांनी हिंदू धर्म संस्कृती, समाज, देव, देश धर्म रक्षणासाठी अखंडपणे दौडत शत्रुंशी लढत ,झगडून आपल्या रक्तातील आग, रग, धग, लढाऊपणाने हिंदू धर्म समाजाचे रक्षण केले हाच रक्तातील आग, रग, धग, लढाऊपणा आजच्या विज्ञानयुगातील तरुणांच्या रक्तात येणे आवश्यक आहे म्हणून या नवरात्रौत्सवात देवी दुर्गामातेचा आशिर्वाद घेत हि दुर्गामाता दौड सर्वत्र सूरू आहे. या श्री दुर्गामाता दौडीची सुरुवात संभाजीराव भिडे गुरुजी यांनी चाळीस वर्षांपूर्वी केली होती ती आजही महाराष्ट्रभर खूप मोठ्या अखंडपणे चालू आहे.