पुरंदरः पुरंदरसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या गुंजवनी जलसिंचन योजनेच्या बंदिस्त जलवाहिनीचे काम १९९३ च्या जुन्या सर्वेप्रमाणे करण्याची मागणी पुरंदर तालुक्यातील गुंजवनी योजनेच्या लाभार्थी गावांतील शेतकऱ्यांची असून, त्याप्रमाणे काम करण्यात यावे अशी मागणी तालुक्याचे आमदार संजय जगताप यांनी केली आहे. याबाबत सोमवारी पुणे येथील सिंचन भवन येथे जलसंपदाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांसह झालेल्या बैठकीत आ. संजय जगताप यांसह गुंजवनी योजनेच्या लाभार्थी गावांतील शेतकऱ्यांनी मागणी केली.
राख, वाल्हे, वाल्हयाच्या सर्व वाड्या, हरणी, परिंचे, माहूर आदी १६ गावांतून १९९३ मध्ये झालेल्या जुन्या सर्वेप्रमाणे गुंजवनीच्या बंदिस्त जलवाहिनीचे काम करणे आवश्यक असून, १९९३ च्या सर्वेक्षणामध्ये ओलिताखाली आरक्षित केलेले सर्व क्षेत्र ओलिताखाली आले पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी परिंचे, वाल्हे, राख या भागातील शेतकरी, ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.