तळेगाव ढमढेरे: प्रतिनिधी आकाश भोरडे
वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील अनाथ बालके व महिलांसाठी कार्य करणाऱ्या समाजसेविका कुसी कुरियन यांना नुकतेच सुहाना कमल सेवा सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील माहेर संस्था समाजसेविका कुसी कुरियन यांनी स्थापन करुन हजारो अनाथ मुलांसह महिलांचे संगोपन करत त्यांना स्वावलंबी बनवले आहे, तर माहेर संस्थेच्या माध्यमातून पंचवीसहून अधिक ठिकाणी अनाथांचा सांभाळ करण्याचे त्यांचे कार्य आहे.
त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना सुहाना कमल पुरस्कार समितीच्या वतीने सुहाना कमल सेवा सन्मान पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती सुहाना कमल पुरस्कार समितीच्या अध्यक्षा माजी खासदार वंदना चव्हाण यांनी दिली. यावेळी प्रवीण मसालेवाले ट्रस्टचे विश्वस्त विशाल चोरडिया, पृथ्वीराज घोरपडे यांसह इतर उपस्थित होते. लवकरच सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. तर लुसि कुरियन यांना नुकतेच त्यांच्या विशेष कार्याची दखल घेऊन भोपाळ राज्यात उत्कृष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुरस्काराने गौरविण्यात आले असून, त्यांच्या दोन्ही पुरस्काराबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.