आरक्षणावर नजरा , हरकतींसाठी २१ जुलै मुदत
भोर – तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे नवीन प्रभाग रचना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये एक गट आणि दोन गण वाढले असून पुर्वी गावे समाविष्ट असण्या-या क्रमवारीत फारसा बदल झालेला नसून इच्छुकांच्या नजरा आरक्षणावर लागल्या असून गट आणि गणांच्या हरकतीसाठी २१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. सध्या आखाड महिना सुरू असल्याने इच्छुक उमेदवार प्रकाशझोतात येण्यासाठी गणातील लोकांसाठी बेत आखाडाचा जेवणावळी सुरू झाल्या आहेत.
इच्छुक उमेदवाराने आपल्या गटातील असणाऱ्या गावातून आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबतीला घेऊन मतदारांमार्फत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू करून भले मोठाले व्हॉट्सॲप, फेसबुक सोशल मीडिया गृप तयार केले आहेत. पुर्वीचा भोलावडे नसरापूर गट वेगळा झाला असून भोलावडे -शिंद असा नव्याने एक गट तयार झाला आहे . यामध्ये वेळवंड खोरे, महुडे खोरे, भुतोंडे खो-यातील काही गावे, हिरडस मावळ (हिर्डोशी निगुडघर)खो-यातील गावांचा समावेश आहे.भोलावडे – शिंद जिल्हा परिषदेच्या या गटात एकूण ७२ गावांचा समावेश आहे .भोलावडे एका गणात ३४ तर शिंद गणात ३८ गावे आहेत.भौगोलिक दृष्ट्या दुर्गम डोंगरी भागातील गावे आल्याने उमेदवारांची गाठीभेटीसाठी मोठी धावपळ सुरू केली आहे.
प्रत्येक उमेदवार आपापल्या गटात , गणात एखादी कार्यालय गावातील हॉल लग्न मंडप घेऊन मतदारांना शाकाहारी मांसाहारी जेवणावळी देत आहेत याला बेत आखाडाचा , स्नेहभोजन , आखाड महोत्सव , आखाड भोजन यासारखी वेगवेगळे नावे देऊन सोशल मीडियावर याचा मोठा प्रचार सुरू आहे. इच्छुक उमेदवार निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी करत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्ते फोन करून जेवणाच्या नियोजनाची माहिती देऊन मतदारांना जेवनासाठी मोठ्या आग्रहाने बोलावत असल्याचे दिसून येत आहे. नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कोण किती खर्च करेल, कोणाचा संपर्क कसा जास्त आहे , कुठे गर्दी जास्त होते , उमेदवाराची पात्रता याकडे कटाक्षाने लक्ष देत आहेत
मागील दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भोलावडेचे लोकनियुक्त विद्यमान सरपंच प्रवीण जगदाळे यांनी आपण इच्छुक असल्याचे दाखवत दोन खोऱ्यातील लोकांना वेगवेगळ्या दिवशी बेत आखाडाचा जेवणावेळी घालत प्राथमिक प्रचार चाचपणी सुरू केली आहे. या गणातील दोन माजी जिल्हा परिषद सदस्य मात्र वेट ॲन्ड वॉच भूमिकेत दिसत आहेत.