भोर: तालुक्यातील गवडी येथील सरपंच काशिनाथ साळुंके यांनी प्रशासनाकडुन कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही असा आरोप करत ग्रामसेवक व पंचायत समिती अधिकारी यांना जबाबदार धरत प्रशासनाच्या कामाचा निषेध व्यक्त करत आपला राजीनामा दिला.
सरपंच यांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील विकास कामांसाठी शासनाकडून भरघोस निधी मंजूर आहे गावच्या ग्रामसभा मधून त्याचा विकास आराखडा ही मंजूर झालेला आहे परंतु वेळोवेळी उडवा उडवीची उत्तरे देऊन ग्रामसेवक आणि संबंधित पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी गावातील विकासकामे प्रलंबित ठेवली आहेत. गावातील लोकांची घरकुले रखडली आहेत, घरपट्टी कर वसुली नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे बिल देता येत नाही. पाणीपुरवठा योजनेचा मोठा निधी अडचणींमुळे प्रलंबित आहे त्याचे निवारण करण्यासाठी ग्रामसेवक दखल घेत नाही.
गावच्या विकास कामांचा पाठपुरावा करूनही टाळाटाळीची कारणे देत अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.अशा अनेक कारणांमुळे सरपंच काशिनाथ साळुंखे व ग्रामस्थ यांनी वैतागून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे यांना घेराव घालत त्यांच्यासमोर तक्रारीचा पाढा वाचत प्रश्नांचा भडीमार केला व अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध व्यक्त करत सरपंचाने तडकाफडकी आपला राजीनामा गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केला .
मी सरपंच होऊन दोन वर्षे झाली आहेत .आमच्या गावाला आतापर्यंत चांगला प्रशिक्षित ग्रामसेवक लाभला नसल्याने गावातील अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. प्रशासन जर याची दखल घेत नसेल तर गावचे सरपंचपद असून तरी काय उपयोग? मागेही मंत्र्यांनी गवडी गावाबाबत मोठा निधी जाहीर करून तो गावाला दिला नाही.
सरपंच काशिनाथ साळुंके