शिरुरः निमोणे येथील मजूर विमलकुमार बहादुर राम यांच्या मुलगी जानवीकुमारी विमलकुमार राम वय अवघे २ वर्ष. या मुलीला विषारी सापाने दंश केला. त्यामुळे तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात तिच्या वडिलांनी नेले. मात्र, वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तिचा दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.
मुलीच्या वडीलांनी तिला संर्प दंश झाल्यानंतर तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र निमोणे येथे उपचारासाठी नेले. तेथे त्यांना तब्बल १५ मिनिटे बसवण्यात आले होते. उपचार न करता तेथील नर्स यांनी या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाही, तुम्ही शिरूर येथे जा आणि उपचार करा, असे सांगितले. मुलीला पुढील उपचारासाठी नेत असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
निमोणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ढिसाळ कारभारामुळे अवघ्या दोन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मुलीच्या वडीलांनी केली आहे.
शिरूर तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नर्सस दवाखाना चालवत असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर उपलब्ध नसतात. यामुळे वरिष्ठांनी याची तातडीने चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.