भोर : पान्हवळ (ता.भोर) येथे महिला दिनाचे औचित्य साधून सोमवार (दि.११) रोजी महिलांना व मुलींना कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजगड पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस हवालदार प्रमिला निकम यांनी मोटीवेशनल स्पीच,निर्भया संदर्भात जनजागृती,बालविवाह संदर्भात, पोसको तसेच सायबर क्राईम संदर्भात माहिती दिली. तसेच डायल 112 संदर्भात माहिती देऊन महिला व मुला मुलींना अडीअडचणी आल्यास आमचा संपर्क क्रमांक देऊन आमचेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
यावेळी सरपंच संध्या देशमाने, आंबवडे केंद्राच्या आरोग्य सेविका विजया निंबाळकर, भोर शहर भाजपाच्या महिला अध्यक्षा, पोलिस पाटिल मंगल गायकवाड , ग्रामपंचायत सदस्या गिता कोंढाळकर, सुरेखा गायकवाड, शिक्षिका ज्योती जाधव, कल्याणी डोईफोडे, आशासेविका वैशाली फाटक, अंगणवाडी सेविका चंद्रभागा कोंढाळकर, हिराबाई खोपडे व ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या. उपसरपंच नितीन कोंढाळकर यांचे सहकार्य लाभले.
मुलांशी सकारात्मक संवाद साधा, मुलाच्या भावनांचा आदर करा, आपण आपल्या व्यस्त कामातून मुलांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वेळ द्या, मुलांचे मित्र मैत्रिणी,शिक्षक,इतर सहकारी यांचेबाबत मुलांशी वरचेवर संवाद साधा,आपण मुलाचे जवळचे मित्र मैत्रिणी आहोत याची जाणीव आपल्या वागण्या बोलण्यातून जाणवून द्या, त्यांचे कामाप्रती प्रोत्साहन द्या, भरपूर स्तुती करा,केलेल्या कामांचे कौतुक करा. मोबाईलमुळे मुले तसेच पालकांमध्ये होत नसलेल्या संवादामुळे पालक आणि मुलांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे.आपण पालक तसेच एक जबाबदार नागरिक म्हणून या तरुणाईला नवनवीन उपक्रम राबवून या सर्व गोष्टी पासून बाहेर काढू शकतो. दर महिन्याला मुलांच्या कला गुणांना वाव मिळतील यासाठी चांगल्या विषयांवर चर्चासत्र, गोष्टी, नाटक, विवध प्रकारचे खेळ तसेच वेगवेगळे प्रबोधनपर व्याख्याने असे उपक्रम राबवून सर्वांविषयी विषयी प्रेम,आदर वाटू लागेल,तसेच स्वतः मध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढेल.निसर्गाने त्यांना लढण्याची ताकद दिली आहे. त्यांचे खच्छीकरण करू नका.त्यांना ऊन,वारा,पाऊस सर्व काही सोसू द्या.मग त्यांचे आयुष्यात कितीही वादळे आली तरी ते भक्कमपणे उभे राहतील.
वाईट सवयींमुळे होणाऱ्या दुष्परिणामांना मुलांना परिणामी आपण पालक म्हणून आपल्याला देखील सामोरे जावे लागेल. येणाऱ्या पिढीचे भवितव्य हे आपणच घडू शकतो,हे सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन महिला हवालदार प्रमिला निकम यांनी केले.