नसरापूरः (विशाल शिंदे) : दि. ६ रोजी नसरापूर ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगनिधी वाटपातील लाभार्थ्यांना डावलल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांची बैठक बोलावली होती. सदर बैठक ही कार्यालयाला काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्या अनुषंगाने ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र नसरापूर ग्रामपंचायत या ठिकाणी बोलावलेल्या बैठकीला चक्क सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी दांडी मारली. तर तक्रारदार सोमनाथ उकिरडे यांचीच तब्बल दोन तास चौकशी केल्याचा अजब प्रकार आता समोर आला आहे. या प्रकरणामुळे येथील नागरिकांच्या भुवया उंचावल्या असून, या बैठकीत नेमलेल्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या अजब भूमिकेकडे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, विभागीय आयुक्त यांच्याकडे २०१७ ते २०२० या कालावधीत दिव्यांगाच्या ५ टक्के अनुशेषाच्या संदर्भात १ मे रोजी तक्रार अर्ज केला होता. त्या अनुषंगाने पुणे विभागाचे उपायुक्त राहुल साकोरे यांनी जिल्हा परिषद पुणे यांना ९ मे २०२४ रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ प्रमाणे कारवाईच्या अनुषंगाने अहवाल मागितला होता. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २४ जून २०२४ रोजी वेल्हे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंकज शेळके यांना चौकशी करण्यासाठी नेमले. शेळके यांनी ३० जुलै २०२४ रोजी भोरचे गटविकास अधिकारी यांना पत्र देऊन याबाबतची माहिती देऊन सूचित केले होते. तसेच नसरापूर ग्रामपंचायतीमधील पदाधिकाऱ्यांनी दि. ६ अॅागस्ट रोजी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे सूचित केले होते. या वेळेला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तक्रारदार, ग्रामविकास अधिकारी व चौकशी अधिकारी शेळके फक्त उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य हे अनुपस्थित होते. या संपूर्ण प्रकणावर एक भलेमोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तक्रारदाराचीच तब्बल दोन तास चौकशी, चौकशी वेळी ग्रामसेवकाचे दप्तरच नाही
ज्यांनी तक्रार दाखल केली होती, त्यांचीच चौकशी अधिकारी पंकज शेळके यांनी तब्बल दोन तास चौकशी करीत तीन पानी लिखित स्वरुपात जबाब नोंदवून घेतला. या चौकशी वेळी शेळके यांनी ग्रामसेवक विजयकुमार अशोख कुलकर्णी यांच्याकडे दप्तर मागितले असता, दोन दिवसांनंतर माझा माणूस तुमच्या ऑफिसला कागदपत्रे पोहोवेल, असे बेधक तोंडी उत्तर दिले. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी चौकशी अधिकारी येणार असल्याची पूर्वकल्पना संबधित असणाऱ्या सगळ्यांना होती. तरी देखील संरपंच, उपसरपंच, पदाधिकारी हे अनुपस्थित राहिले. तर ग्रामसेवकाकडून चालढकलचे उत्तर आले.
दिव्यांग निधी वाटपात झालेल्या अनियमिततेबाबत विभागीय आयुक्तांना तक्रार देऊन सर्व कागदोपत्री पुरावे सादर केली आहेत. त्यानुसार पंकज शेळके यांनी चौकशी केली असून ग्रामपंचायत नसरापूरचे कार्यकारी मंडळ जाणीवपूर्वक गैरहजर होते. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होणे अपेक्षित आहे.
सोमनाथ उकिरडे, (तक्रारदार) नसरापूर
दिव्यांग निधी वाटप तक्रारीबाबत वरिष्ठ कार्यालयाचे आदेशानुसार नसरापूर ग्रामपंचायत कार्यालयात चौकशीचे कामकाज केले. त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवणार आहे.
पंकज शेळके, गटविकास अधिकारी वेल्हे