भोर : पुण्यातील धनकवडी येथील एका तरुणाने रविवारी (ता. १५) सायंकाळी वरंधा घाटातील नीरा-देवघर धरणात उडी मारून आत्महत्या केली. मृतकाचे नाव श्रीकांत जाधव असून त्याने पत्नीला फोन करून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले होते.
घटनास्थळी धावून गेलेल्या भोर पोलिसांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर जाधव यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव आपली मारुती कार घेऊन वरंधा घाटात आला होता आणि त्यानंतर धरणात उडी मारली.
दोन तासांनंतर मृतदेह सापडला
घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी, नायब तहसीलदार, मंडलाधिकारी, वारवंडचे पोलीस पाटील आणि भोईराज जलआपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या कार्यकर्त्यांसह संयुक्त शोध मोहीम हाती घेतली.
घाटातील रस्त्याच्या कडेला जाधवची मोटार उभी असल्याचे पाहून पोलिसांनी परिसराचा बारकाईने शोध घेतला. अखेर, नवलाई पूल परिसरात निरा-देवघर धरणाच्या पाण्यात जाधव यांचा मृतदेह सापडला.
पत्नीला फोन करून दिली होती माहिती
घटनेच्या कारणांचा अद्याप उलगडा झालेला नाही. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.