भोर – तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील वेळवंड येथील प्राथमिक-माध्यमिक शाळा व पांगारीतील शासकीय आश्रमशाळेतील १५९ विद्यार्थ्यांची सोमवारी (दि.२५) राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय भोर यांचेतर्फे तपासणी करण्यात आली.
वेळवंड खो-यात सध्या पावसाचे प्रमाण जास्त असून साथीच्या आजारांनी नागरिक हैराण झाल्याने १६ ऑगस्टला पांगारी आश्रम शाळेतील २० विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची बाधा झाल्याने रामबाग भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने तपासणीसाठी आणले होते. तसेच वातावरणातील बदलामुळे व खराब हवामानामुळे साथीचा आजारांपासून बचाव करण्यासाठी आरोग्य शिबीर घेण्याची मागणी पांगारी विकास सोसायटीचे चेअरमन पंढरीनाथ राजीवडे यांनी केली होती. त्यानूसार उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद साबणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी हे आरोग्य शिबीर घेण्यात आले. शिबीरात उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. सुनिल पाटणे, डॉ. कविता भोसले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांची तपासणी केली. सर्दी,ताप खोकला आजारांवर औषधं देण्यात आली. यावेळी औषधनिर्माण अधिकारी सविता कदम, पंढरीनाथ राजीवडे, निलेश मोरे, बाळासाहेब दुरकर, मुख्याध्यापक श्रीकृष्ण दहिफळे,राजेंद्र पडवळ, शौकत अली शेख व शिक्षक उपस्थित होते.