राजगडः भोर विधानसभा क्षेत्रातील दुर्गम भाग म्हणून आणि निसर्गाने नटलेला भाग म्हणून राजगड तालुक्याचे ओळख आहे. यंदाच्या निवडणुकीत देखील या तालुक्यातील मतदारांचा मतदानात मोठा सहभाग दिसून आला. त्याचप्रमाणे मुळशी तालुक्यातील मतदारांना आपला बहुमूल्य मतदानाचा हक्क बजावित लोकशाहीला बळकट करण्याचे काम केले. येथील वरसगाव धरण खोऱ्यातील तव मतदान केंद्रांवर १०७ वर्षांच्या आजोबांनी आपल्या तीन पिढ्यांच्या कुटुंबासोबत मतदान केले. धाऊ कोंडीबा मरगळे असे १०७ वय असणाऱ्या मतदाराचे नाव आहे.
मरगळे आजोबांबरोबर त्यांच्या परिवारातील १६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. धाऊ मरगळे यांच्या भावजय, मुलगे, सुना, नातवंडे, नातसुना यांनी मतदान केले. यावेळी मोसे खोरे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष लालासाहेब पासलकर व ग्रामस्थांनी मरगळे परिवाराला शुभेच्छा दिल्या. मतदान करण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील भोरदेव धनगरवस्तीतून ९ किलोमीटर अंतराची पायपीट करत मरगळे परिवार मतदान केंद्रावर आला होता. लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येक निवडणुकीत धाऊ मरगळे सहभागी होत असून, महाराष्ट्र विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून त्यांनी सर्व विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे.