पारगांवः प्रतिनिधी धनाजी ताकवणे
दौंड तालुक्यातील काही भागात आणि राहू येथील परिसरात बिबट्याचा हैदोस वाढल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. राहु (ता.दौंड) येथील महेंद्र बंडोपंत माकर यांच्या गोठ्यातील एक बकरे शनिवारी (ता. ३१) रोजी बिबट्याने फस्त केली. बंदिस्त असलेल्या भिंतीवरुन बिबट्याने उडी मारत एक बकरे ठार केली. तर त्या ठिकाणी असणाऱ्या पाळीव कुत्र्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. सुदैवाने या घटनेत गोठ्यातील इतर जनावरांना बिबट्याने ईजा केली नाही.
भीमा नदीच्या पट्ट्यातील भागात पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले होत असल्यामुळे राहू परिसर तसेच दौंड तालुक्यातील अनेक भागात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. दोनच दिवसांपूर्वी राहू माधवनगर येथील हरपळे यांच्या शेतातील घरामध्ये परिसरामध्ये बिबट्याने शेतकऱ्यांच्या कोंबड्या फस्त केल्या असल्याची माहिती शेतकरी संजय कुल यांनी दिली.
वनविभागाच्या कर्माचाऱ्यांनी या नुकसानीचा पंचनामा केला असून, नुकसानभरपाई देण्याची मागणी सरपंच दिलीप देशमुख यांनी केली आहे. राहू बेट परिसरामध्ये सातत्याने दिवसाही बिबट्याचे दर्शन होत असून या परिसरामध्ये पिंजरा लावण्याची मागणी युवक कार्यकर्ते प्रदीप सोनवणे यांनी केली आहे.