दौंड : शहरात पंतप्रधान आवास योजनेतील अनुदान रक्कम मंजूर करण्यासाठी दहा हजार रूपयांची लाच स्वीकारताना दौंड नगरपालिकेच्या एका प्रकल्प अभियंता व त्याच्या खासगी साथीदारास अटक करण्यात आली आहे.
नगरपालिकेच्या कार्यालयात १८ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. दौंड नगरपालिकेतील पंतप्रधान शहरी आवास योजना विभागाचा प्रकल्प अभियंता विजय नाळे व त्याचा खासगी सहकारी प्रशांत जगताप (दोघे रा. श्रीगोंदा, जि. नगर) यांना लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले आहे.
शहरातील एका नागरिकास पंतप्रधान शहरी आवास योजनांतर्गत देय असलेले अनुदानाच्या रकमेचा धनादेश देण्यासाठी प्रकल्प अभियंता विजय नाळे व त्याचा खासगी सहकारी प्रशांत जगताप यांनी पन्नास हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोडअंती तीन टप्प्यांमध्ये एकूण तीस हजार रूपये देण्याचे ठरले.
दरम्यान, नगरपालिकेच्या अडवणुकीमुळे त्रस्त झालेल्या या नागरिकाने या बाबत पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक वीरनाथ माने यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सायंकाळी विजय नाळे व प्रशांत जगताप या दोघांना सापळा रचून नगरपालिका कार्यालय परिसरात दहा हजार रूपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.
दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. प्रकल्प अभियंता विजय नाळे व प्रशांत जगताप हे कोणाच्या सांगण्यावर लाच स्वीकारत होते आणि या लाचखोरीच्या साखळीत वरिष्ठांचा सहभाग आहे का?, याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करीत आहे.