अनधिकृत बांधकाम तोडुन ओढ्याचा प्रवाह पुर्ववत करणार.
तहसिलदार यांनी आदेश देऊनही या ओढ्यातील बांधकाम अतिक्रमण हटवण्यात आले नव्हते
नसरापूर ता.६. भोर तालुक्यातील सासेवडी येथे महामार्गालगत जाणाऱ्या ओढ्यावर बेकायदेशीर बांधकाम करून त्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्यात आला होता. या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी भोर महसुल विभागाने पोलिस प्रशासन आणि पीएमआरडीएच्या सहकार्याने मोहीम राबवली आहे. या मोहिमेत अनधिकृत बांधकाम पाडून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्यात येणार आहे.
ससेवाडी येथील गट क्रमांक १०१ मधील नैसर्गिक ओढ्यात झालेल्या अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. तहसीलदार भोर यांनी दिलेल्या आदेशानंतरही अतिक्रमण हटवण्यात आले नसल्याने महसुल विभागाने ३ एप्रिल रोजी मोहीम राबवून हे अतिक्रमण हटविण्यास सुरावात केली.
या ओढ्यातून पुणे-साताऱ्या महामार्गाकडे पाणी वाहते. २०२२ पासून या ओढ्यात अतिक्रमण होत होते आणि ओढ्याचा मार्ग बदलून त्याची रुंदी कमी करण्यात येत होती. याबाबत परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्यानंतर तहसीलदार यांनी जून २०२२ मध्ये पाहणी करून अहवाल दिला होता. या अहवालात ओढ्यात आरसीसी बांधकाम करून नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण केल्याचे म्हटले होते.
यानंतरही तक्रारी आल्याने जून २०२३ मध्ये मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी संयुक्त अहवाल सादर केला. या अहवालात ओढ्याचा प्रवाह अरुंद करून भिंतीचे बांधकाम केल्याचे आणि भविष्यात यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. यानंतर तहसीलदार यांनी अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते.
मात्र, तहसीलदारांच्या आदेशानंतरही अतिक्रमण हटवण्यात आले नव्हते. काही तक्रारदारांनी हरित लवादाकडेही तक्रार केली होती. हरित लवादाने पुणे जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठवण्यास सांगितले होते. यानंतर महसुल विभागाने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
३ एप्रिल रोजी भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली यंत्रणेसह अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली. यावेळी मंडलाधिकारी प्रभावती कोरे, पीएमआरडीएचे राणा पाटील, महामार्ग प्राधिकरणाचे अभिजित गायकवाड, पोलिस फौजदार संजय सुतनासे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि तालुक्यातील सर्व मंडलाधिकारी, तलाठी उपस्थित होते.
जुलै 2023 मध्येच या ओढ्यातील अतिक्रमण काढुन नैसर्गिक प्रवाह पुर्ववत करण्या बाबत निकाल दिला होता त्या नंतर देखिल संबधीतांनी अतिक्रमण काढले नव्हते त्यांना नोटीस बजावल्या होत्या मात्र त्याला देखिल प्रतिसाद न दिल्याने ता.3 रोजी महसुल विभागाने पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने कारवाई करत ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह पुर्ववत करण्यास सुरुवात केली आहे तसेच त्या ठिकाणी केलेल्या बांधकामा बाबत पीएमआरडीए ला मोजणी करुन बांधकाम काढुन टाकण्याच्या सुचना दिल्या आहेत.
– सचिन पाटील ,तहसीलदार भोर