नसरापूर (ता. भोर) : बनेश्वर वन उद्यान परिसरात विनापरवाना प्रवेश करून मधमाशांचे पोळे काढल्याप्रकरणी बनेश्वर मंदिर ट्रस्टचे सचिव अनिल गायावळ आणि सायबू मारुती मुकणे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वनक्षेत्रातील सुरक्षेचे नियम आणि पर्यावरण संरक्षणाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
वन परिक्षेत्र अधिकारी, नसरापूर यांच्या अखत्यारीतील बनेश्वर वन उद्यानात 18 मार्च 2026 रोजी रात्री ही घटना घडली. अधिकृत माहितीनुसार, जंगल कक्ष क्रमांक 509 मध्ये अनिल गयावळ (रा. नसरापूर) यांच्या सूचनेनुसार सायबू मुकणे (रा. वाघजवाडी, किकवी ता. भोर, जि. पुणे) व काही मजूरांनी कोणतीही परवानगी न घेता वनक्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी आग लावून मधमाशांचे पोळे काढण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे परिसरातील जैवविविधतेला धोका निर्माण झाला.
घटना उघडकीस आल्यानंतर वन विभागाने तत्काळ हालचाल करत संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वनक्षेत्रात विनापरवाना प्रवेश करणे, तसेच आग लावून नैसर्गिक अधिवासाला हानी पोहोचवणे हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे मानले जातात.
वन विभागाच्या अधिकारी वसंत चव्हाण यांनी सांगितले की, मधमाशा परिसंस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्यांच्या पोळ्यांवर आघात झाल्यास परागीभवन प्रक्रियेवर परिणाम होतो, ज्याचा शेती आणि पर्यावरणावर दूरगामी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ही कारवाई वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय, नसरापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास परिमंडळ वन अधिकारी विद्या पवार करत आहेत.















