बाळू शिंदे:राजगड न्युज
कापूरहोळ :राजगड पोलीस ठाण्याचे हद्दीत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण दिवसंदिवस वाढत असून चोरांना पोलिसांचा धाक राहिला नाही.दिनांक 5ते6 रोजी तर चोरट्यांनी कामथडी, सारोळा ,भोंगवली,भागात शेतकरी आणि दुकानदार यांच्या मालावर डल्ला मारला असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार भोंगवली (ता. भोर) येथील धेवडजाई लघुपाटबंधारे तलावात शेतीच्या पाण्यासाठी लावलेल्या मोटरची सुमारे ४४० मिटर कॉपरपट्टी केबल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. भोंगवली येथील शेतकरी श्रीकांत गुलाब निगडे (वय ३५) यांची चार हजार दोनशे रुपयांची ७० मीटर कॉपरपट्टी केबल, जयसिंग माधवराव निगडे (वय (७०) यांची चार हजार ८०० रुपयांची ८० मीटर केबल, विजय माधवराव निगडे (वय ६५) यांची चार हजार ८०० रुपयांची ८० मीटर केबल, महादेव सीताराम सुर्वे (वय ५८) यांची चार हजार २०० रुपयांची ७० मीटर केबल, गणेश दत्तात्रेय सुर्वे (वय ४२) यांची चार हजार २०० रुपयांची ७० मीटर केबल व सुहास शंकर सुर्वे (वय ५८) यांची चार हजार २०० रुपयांची ७० मीटर केबल, अशी मिळून एकूण २६ हजार ४०० रुपयांची कॉपर केबल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मागील काही महिन्यात निरानदी किनारीच्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या केबलची चोरी झाली असून याबाबत शेतकऱ्यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्याप चोरट्यांचा तपास लागला नसून या चोरट्यांना पायबंद घालण्याची मागणी शेतकरी करत आहे.तर दुसऱ्या घटनेत पुणे-सातारा महामार्गावर कामथडी (ता. भोर) येथे हॉटेलजवळील स्नॅक सेंटरच्या दहा दुकान गाळ्यांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न केला.
महामार्गावर कामथडी गावच्या हद्दीत हॉटेललगत गणेश जाधव यांचे दुकानाचे दहा गाळे असून स्नॅक सेंटरसाठी ते भाड्याने दिले आहेत. ६ आक्टोंबरच्या रात्री काही अज्ञात चोरट्यांनी यासर्व दहा गाळ्यांचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. आत काहीच न मिळाल्याने दुकानांमधील साहित्य चोरट्यांनी अस्ताव्यस्त फेकून नासधूस केली.गाळा मालक गणेश जाधव (वय २६, रा. केळवडे ता. भोर) यांनी राजगड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. महामार्गावर अशा पद्धतीने चोऱ्या होवू नये यासाठी महामार्गावर रात्री एक-दोननंतर पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी छोट्या व्यावसायिकांनी केली आहे.
तिसऱ्या घटनेत कामथडी (ता. भोर) येथून गुरुवारी (ता.५) रात्री स्वामी समर्थ नर्सरीमध्ये लावलेली १.५ एचपीची सुमारे ३७ हजार रुपये किमतीची इलेक्ट्रीक मोटर आणि वायर चोरली. स्वामी समर्थ नर्सरी चे मालक दीपक दत्तात्रेय वाल्हेकर (वय ३४, रा. कामथडी ता. भोर) यांनी राजगड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरविरूद्ध तक्रार दिली आहे.