पुरंदर विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखरित्याखाली बैठक घेण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी पुरंदरचे आमदार संजय जगताप यांची आमसभा होती. त्यामुळे ही बैठक नंतर घेण्यात यावी, याचे कारण म्हणजे त्याच दिवशी आमसभा असल्याने विशेष अधिकाराचा भंग होऊ शकतो, अशी विनंती जगताप यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली होती. तरी देखील बैठक घेण्यात आली असल्याचे जगताप यांनी सांगितले. यामुळे या प्रकरणी जगताप यांनी आपल्या विशेष अधिकाराचा वापर करीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुध्द विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विशेष अधिकार भंग व अवमानाची सूचना केली आहे. याबाबतची माहिती आमदार संजय जगताप यांनी सासवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत त्यांनी “जे प्रश्न तुम्हीच प्रलंबित ठेवले त्याच्यासाठी बैठक घेतली”, असल्याचा आरोप केला आहे. तसेच ज्या दिवशी आमसभा होती. त्या दिवशी मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक यांच्याशी फोनद्वारे बोलणे झाले होते. तसेच इमेल करुन ही बैठक नंतर घेण्यात यावी, अशी विनंती देखील पत्रव्यवहार व इमेलद्वारे करण्यात आली होती. असे जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्याविरुध्द महाराष्ट्र विधानसभा नियम २७४ अन्वये विशेष अधिकार भंग व अवमानाची सूचना विधासभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे. या विशेष अधिकाराचे संरक्षण करणे अध्यक्षांची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या बैठकीमुळे आमसभेच्या बैठकीला अनेक अधिकारी उपस्थित राहू शकले नाहीत.
अनेक योजना अजूनही प्रलंबित आहेत. त्यावर “सही करायला मुख्यमंत्र्याना वेळ नाही का”? असा सवाल करीत राज्यातील सरकार यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून, केवळ फार्स करीत आहे. सरकारकडून विकास कामांसाठी लागणारा निधीची तरतूद झाली पण निधी अजूनही वर्ग करण्यात आलेला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. जेथे गरज नसताना काहींच्या सांगण्यावरुन निधी दिला जात आहे. हा एकप्रकारचा दुजा भाव नाही का, असे म्हणत राज्यातील आणि केंद्रातील सरकारवर अनेक प्रश्नांचा पाढा वाचत आमदार संजय जगताप यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टिकास्त्र डागले. यामुळे आता पुरंदर विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांची अगामी काळात सोडवणूक होईल का? हे येणारा काळाच सांगेल.