बारामती प्रतिनिधी (सनी पटेल): भवानीनगर (सणसर) येथील भवानी माता मंदिर परिसरात शुक्रवारी (दि. ३१) सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास महाविद्यालयीन प्रेमसंबंधाच्या कारणावरून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संचित घोळवे आणि सुजल जाधव गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, संचित घोळवे व सुजल जाधव मंदिर परिसरात बसले असताना ओम धुमाळ आणि त्याचे मित्र अदनान शेख, पियूष चव्हाण, यश अरवडे व निखिल शिंदे यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. आरोपींपैकी ओम धुमाळने संचित घोळवे याला “तू माझ्या मामाच्या मुलीशी प्रेमसंबंध ठेवतोस, तुला सोडणार नाही” असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अदनान शेख आणि ओम धुमाळ यांनी लोखंडी कोयत्याने संचित घोळवे आणि सुजल जाधव यांच्यावर वार केले. या हल्ल्यात सुजल जाधवच्या डोक्यावर जबरदस्त वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला.
घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुजल जाधवला पाहून आरोपी पळून गेले. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. आरोपी पुण्याच्या दिशेने पळाल्याची तांत्रिक माहिती मिळताच, दोन वेगवेगळी पथके तयार करून सुपा पोयि ठाण्याच्या हद्दीतील जळगाव येथे त्यांना अटक आली.
या यशस्वी कारवाईत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूणगे, विजय टिळकीकर, दादासाहेब डोईफोडे, गुलाबराव पाटील, बापू मोहिते, शैलेश स्वामी, गणेश काटकर, अजित थोरात, नानासाहेब आटोळे, सचिन गायकवाड, अभिजीत कसळकर आणि विक्रम जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.