भोर: काही आपत्कालीन परिस्थिती ओढावली असेल अथवा तुम्ही काही संकटात असाल तर तुम्ही 112 या क्रमांकावर फोन करून पोलिसांची मदत मिळवू शकता. त्यासाठी शासनाने 112 हा क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. मात्र अनेकदा काही महाभाग उठसुठ कोणत्याही क्षुल्लक करणासाठी 112 वर फोन करत आहेत. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली असून अशा प्रकारांमुळे पोलिसांचा वेळ वाया जात आहे.
तुमच्यावर कोणी हल्ला केला असेल, कोणी मारहाण करत असेल, प्रवासात असताना अपघात झाला तसेच कोणी तुम्हाला लूटत आहे, या प्रकारच्या परिस्थितीत तुम्ही 112 वर फोन करून मदत मिळवू शकता. त्यामुळे 112 या क्रमांकामुळे अनेकांना संकट काळात ताबडतोब पोलिसांची मदत होते. मात्र अनेकवेळा काहीही शुल्लक कारणासाठी काही महाभाग 112 वर फोन करून पोलिसांचा वेळ वाया घालवत आहेत. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
तर घडले असे की, एका हॉटेलमधील तरुण ग्राहकाने अंडा करीमध्ये अंडे नसल्याबद्दल तक्रार करण्यासाठी 112 वर फोन केला. यामुळे अनावश्यक खटपट झाली आणि परिसरात मात्र चर्चा रंगू लागली.
घटनेनुसार, एक तरुण ग्राहक हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेला होता. त्याने अंडा करी मागवले. काही वेळानंतर जेव्हा त्याला करी मिळाली तेव्हा त्यात अंडे नसल्याचे त्याला दिसले. यावरून त्याने हॉटेल कर्मचाऱ्यांशी वाद घातला. वाद वाढत गेल्याने त्याने रागाच्या भरात 112 वर फोन करून पोलिसांना बोलावून घेतले.
पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्या तरुणाची तक्रार ऐकून हसून गेले. हॉटेल मालकाने पोलिसांना सांगितले की तरुणाने अंडा करीमधील अंडे खाऊन टाकले होते आणि नंतर अंडे नसल्याची तक्रार करत होता.
या घटनेमुळे पोलिसांचा वेळ वाया गेला आणि नागरिकांमध्येही नकारात्मक प्रतिक्रिया निर्माण झाली. अशा प्रकारे, अनावश्यक कारणांसाठी 112 वर फोन करून पोलिसांचा वेळ वाया घालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.