खेड शिवापूर, २३ एप्रिल २०२४:आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा महामार्गावरील शिवरे गावच्या हद्दीत अल्कोहोल वाहतूक करणारा टँकर पलटी झाला आहे. यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टँकर हा सातारा कडून पुण्याकडे जात होता. शिवरे गावाजवळील एका वळणावर टँकरचा चालक ताब्यात न आल्याने तो रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. यात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
पलटी झालेल्या टँकरमधून अल्कोहोल रस्त्यावर थोड्या प्रमाणात सांडला आहे. यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि रस्त्यावरील टँकर काढण्याचे काम सुरू आहे. पोलिस आणि महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी, चार क्रेन तर अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. शर्तीचे प्रयत्न करून देखील अल्कोहोलने भरलेला टँकर उचलला जात नाहीये. यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या वाहतूक कोंडीमुळे पुणे आणि सातारा या दोन्ही शहरांमधील प्रवाशांना मोठी गैरसोय होत आहे. वाहतूक कोंडी कधी सुटेल याचा अंदाज अद्याप येऊ शकलेला नाही.