भोर, ता. दि. [२०]: भोर तालुक्यातील भोंगवली ग्रामपंचायत कार्यालयाला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत कार्यालयातील बहुतांश कागदपत्रे जळून खाक झाली असून, कंप्युटर टेबलही पूर्णतः जळून खाक झालं आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार,सकाळी सातच्या सुमारास देवदर्शनार्थ येणाऱ्या ग्रामस्थांनी कार्यालयातून धूर निघत असल्याचं पाहून स्थानिक सरपंच अरुण पवार आणि क्लार्क स्नेहल सुर्वे यांना तातडीने या घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पदाधिकारींनी कार्यालयाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीचा धूर इतका तीव्र होता की, कोणीही आत प्रवेश करू शकले नाही.
अंदाजानुसार, ही आग मध्यरात्रीच्या सुमारास लागली असावी. आगीच्या भीषण स्वरूपामुळे कार्यालयातील बहुतांश साहित्य जळून खाक झालं आहे. कोणती कागदपत्रे जळाली आहेत, याची सविस्तर माहिती पंचनामा झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. नागरिकांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांबरोबरच, ग्रामपंचायतीच्या अनेक महत्त्वाच्या नोंदीही जळून खाक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामसेवक बिराजदार यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविलं असून, पुढील कारवाई सुरू आहे.