भोरः भाजपचे भोर विधानसभा प्रमुख किरण दगडे यांच्या वतीने भोर, वेल्हा(राजगड) आणि मुळशी तालुक्यातील नागरिकांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर किराणा किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या जाहीर कार्यक्रमामध्ये किरण दगडे यांचे निकटवर्तीय गायकडवाड असे नाव असलेल्या व्यक्तीची भाषण करतेवेळी जीभ घरसली आहे. त्यांनी भाषणातून दिग्गज नेत्यांवर खालच्या शब्दांत जहरी टीका केली आहे. यामुळे काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला असून, अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणी तालुक्यातील काँग्रेसप्रेमींकडून पोलीस स्टेशनला संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या पत्र पोलीस स्टेशनला देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
नेमकं काय म्हणाली ती निकटवर्तीय व्यक्ती
राजकारणात आरोप प्रत्यारोप वा हेवेदावे होतच असतात. परंतु अनेकदा राजकरणात भाषेचा स्तर घसरला असल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. किरण दगडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अशीच एक घटना घडली आहे. यामध्ये त्यांचे निकटवर्तीयांनी मा. मंत्री अनंतराव थोपटे, तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे आणि मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली आहे.
एक संग्राम, दुसरा पृथ्वीराज आणि तिसरा अनंतरावः निकटवर्तीयांचे विधान
हा पृथ्वाराज राज्य करायला निघाला आहे, याने पहिल्यांदा तालुक्यात राज्य करून दाखवावे यानंतर पृथ्वीचा विचार करावा.
संग्राम आधी युद्ध जिंकाव लागतं, त्यानंतर घोडा सोडावा लागतो, जो आडवेल त्याच्याबरोबर युद्ध करावं लागतं, यामध्ये जो विजयी होईल त्यालाच संग्राम म्हटलं जातं. हा कुठे गेला होता युद्ध करायला अशी जहरी टीका या निकटवर्तीयांने आमदार संग्राम थोपटेंवर केली आहे.
तसेच भोर तालुक्यातील सत्तर आणि त्यानंतरच्या काळात ज्या व्यक्तीने मंत्री पद भूषविले. भोर तालुक्याला वेगळी ओळख निर्माण करून दिली. तब्बल ६ वेळा या मतदार संघाचे नेतृत्व विधानसभेत केले. अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत पाठपुरावा केला. शिक्षणसंस्थानच्या मार्फत शिक्षण देण्याचे पवित्र कामे मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्याविषयी देखील या निकटवर्तीयाने अत्यंत खालच्या शब्दांत टीका केली. त्यांच्याविषयी बेताल वक्तव्य केले. त्यांच्या वयाचा मान राखता त्यांचा राजकारणात गाढा अनुभव पाहता त्यांना “अनंतात विलीन करा” असे म्हणणे योग्य नाही.
या बेताल विधानांचे तीव्र स्वरुपाचे पडसाद तालुक्यात उमटले असून सर्व स्तरावरून या गोष्टीचा निषेध नोंदविण्यात येत आहे. या विषयी तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या गोष्टीचा निषेध व्यक्त केला आहे. राजकारणात इतक्या खालच्या स्तरावर जाऊन टीका करणे योग्य नसल्याचे थोपटे यांनी सांगितले.
किरण दगडे यांनी केली दिलगिरी व्यक्त
किरण दगडे यांनी केलेल्या आयोजित कार्यक्रमात झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी जाहीर सभेमध्ये दिलगिरी व्यक्त केली.