भोर: भाटघर व वीर येथील बाधित झालेल्या गावांच्या पुर्नवसन तसेच गावांना नागरी सुविधांसाठी २४ कोटी रुपयांच्या निधीची मंजूरी मिळाली आहे. हा निधी मिळवून देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (ajit pawar) यांच्यामध्ये श्रेयवादाचे लढाई सुरू झाल्याचे चित्र पाहिला मिळत आहेत. दोन्ही पक्षांच्या वतीने पत्रकार परिषदेमधून या प्रकरणी दावा करण्यात आला आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात विकास कामांवरुन श्रेयवाद घेण्याचे काम दोन्हींकडून करण्यात येत आहे.
अजित दादांच्या माध्यमातून कामांना मंजूरीः जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष रणजीत शिवतरे
तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे (sangram thopate) यांच्या पाठपुरव्यामुळे सदर कामाचा निधी मंजूर झाला असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या कामांना मंजूरी देण्यात आल्याचा दावा या पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. दोन्ही धरणातील नागरी सुविधांसाठी पालकमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार पुर्नवसनमंत्री अनिल पाटील यांनी निधी मंजूर केला असून त्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने पाठपुरावा केला. त्यामुळे निधी मंजूर झाला असल्याचे जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष रणजीत शिवतरे (ranjit shivtare) यांनी सांगितले आहे.
जनता निवडणुकीत उत्तर देईलः काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे
दरम्यान, भाटघर व वीर धरणग्रस्तांना १८ नागरी सुविधांमधून विविध विकास कामे मंजूर झाली आहेत. दोन्ही प्रकल्पात आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून काम सुरु आहे. तसेच २०१०- २०११ पासून तत्कालीन पुर्नवसनमंत्री पतंगराव कदम, विजय वड्डेटीवार, बाळा भेगडे यांच्या माध्यमातून निधी मंजूर झाला आहे. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते लोकांमध्ये चुकीचे माहिती सांगून निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कामांचे श्रेय घेण्यासाठी नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सगळ्याला जनता निवडणुकीत त्यांना नक्की उत्तर देईल, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे (shailesh sonavane) यांनी केली आहे.
रोजगारांची संधी देण्याची तरुणांकडून मागणी
तालुक्यात रोजगाराची संधी नसल्यामुळे येथील अनेक तरुण बेरोजगार आहेत. त्यामुळे नोकरी, व्यवसायासाठी तरुणांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. असे असताना राजकीय नेतेमंडळी विकास कामांचे श्रेय घेण्यात व्यग्र असल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. कामात श्रेयवाद घेण्यापेक्षा तालुक्यातील महत्वाच्या एमआयडीसी, पर्यटन विकास, दर्जेदार रस्ते, दोन्ही धरणावरील पर्यटन, शेती पाणी प्रश्न यासाठी मोठा निधी मंजूर करावा अशी येथील नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच तरुणांचा रोजगाराचा प्रश्न मिटवावा, अशी चर्चा देखील तरुण सोशल मिडीयाच्या माध्यमातून करत असल्याचे दिसून येत आहे.