भोर: नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून आज भोरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरापासून महामार्ग पट्ट्यापर्यंत चर्चेत असलेला प्रमुख मुद्दा म्हणजे त्या भागातील एका तरुण नेतृत्त्वाचा भाजपमध्ये प्रवेश होणार का? याबाबत निश्चित घोषणा नसली तरी राजकीय वर्तुळात त्याबद्दल मोठी चर्चा असून हा प्रवेश झाला तर आगामी निवडणुकीच्या समीकरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे.
सदर युवक गेल्या काही वर्षांपासून सामाजिक काम, शैक्षणिक उपक्रम व क्रीडा प्रोत्साहनात सक्रिय आहे. विशेषत: भोर-खंडाळा महामार्ग पट्ट्यातील तरुणांमध्ये त्याचे चांगले संपर्क आणि मजबूत जनाधार आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत थेट रिंगणात उतरण्याची त्याची इच्छा असल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे. विकासाभिमुख विचारसरणी, तरुणांना संधी आणि बदलाची आवश्यकता या मुद्द्यावर तो सतत आवाज उठवत आला आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश झाल्यास पक्षाला तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये मोठा फायदा होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
भोर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणांगणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेमुळे भाजपचा उत्साह वाढला असताना, या तरुण नेत्याच्या संभाव्य प्रवेशामुळे त्या उत्साहात आणखी वाढ झाली आहे. अनेक कार्यकर्ते आणि समर्थक सभेसाठी मोठ्या संख्येने दाखल होणार असल्याचे दिसून येत आहे.
संभाव्य उमेदवारांच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांत उमेदवारीसाठी हालचाल सुरू आहे. तरुण नेत्यांच्या नेतृत्वामुळे ग्रामीण भागात राजकीय समीकरणे बदलू लागली असून त्यामध्ये महामार्ग पट्ट्यातील हा युवक निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत नवीन नेतृत्व, विकास आणि प्रामाणिकतेच्या मुद्यावर मतदान होणार असल्याने आजची सभा अनेकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
राजकारणात तरुण पिढीचा सहभाग वाढत असताना त्या युवकाचा भाजप प्रवेश होतो की नाही, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
















