भोर – तालुक्यातील वेळवंड खोरे डोंगराळ दुर्गम भागात विखुरलेले असुन या भागात एकही खाजगी दवाखाना नाही. सद्यस्थितीला बदलत्या वातावरणामुळे वेळवंड खोऱ्यात साथीच्या आजारात वाढ होऊन रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. याची दखल घेत राजेश बोडके युवा मंच, वेळवंड खोऱ्यातील कार्यकर्त्यांनी रुग्णांसाठी धाव घेतली आहे. राजेश बोडके युवा मंचच्या कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून लाईफ लाईन फाउंडेशनच्या वतीने वेळवंड खोऱ्यात ‘ डॉक्टर आपल्या दारी ‘ हा उपक्रम राबवण्यात आला असून वेळवंड खोऱ्यात गावागावांमधून फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे. ही रुग्णसेवा मोफत देण्यात येत आहे. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी ॲम्बुलन्स व डॉक्टरांची टीम वेळवंड खोऱ्यातील प्रत्येक गावात जाऊन सेवा देणार आहे. यामध्ये सर्दी, खोकला, जुलाब, उलटी, अंगदुखी, मलमपट्टी यांसारख्या अनेक आजारांवर मोफत उपचार होणार असून औषधांचेही मोफत वाटप होणार आहे अशी माहिती राजेश बोडके यांनी दिली.
लाईफ लाईन फाउंडेशन मार्फत हा फिरता दवाखाना वेळवंड खोऱ्यातील प्रत्येक गावात मोफत रुग्णसेवा देणार असून गुरुवारी बसरापूर येथे दुपारी १२ ते १, बारे खुर्द येथे दुपारी १ ते २, बारे बुद्रुक येथे २ ते ३, म्हाळवडी येथे ३ ते ४, कर्नवडी येथे ४ ते ५ वाजता रुग्णसेवा देणार आहे. शुक्रवारी बिरामणे वस्ती व पसुरेतील सर्व वाड्यांमध्ये दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत रुग्णसेवा देण्यात येणार आहे. नांदूघर गावात दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत, जयतपाड मध्ये ३ ते ४, राजघर मध्ये ४ ते ५ रुग्णसेवा देण्यात येणार आहे. शनिवारी वेळवंड गावात दुपारी १२ ते १, पांगारी गावात १ ते २, डेहनमध्ये २ ते ३, नानावळे गावात ३ ते ४ या वेळेत मोफत रुग्णसेवा देण्यात येणार आहे. आवश्यकते नुसार या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.
”सदरचा उपक्रम सुरू झाला असुन नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे रुग्णांना वेळेवर औषध मिळाल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. प्रत्येक गावात ॲम्बुलन्स आल्यानंतर गावच्या मुख्य ठिकाणी सायरन वाजत असुन, आजारी रुग्ण यावेळी जाऊन या सेवेचा मोफत लाभ घेत आहेत यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे” राजेश बोडके – सामाजिक कार्यकर्ते म्हाळवडी (ता. भोर)