विद्यार्थ्यांना संपूर्ण निवडणूक कार्यक्रमाची सविस्तर माहिती
भोर– पुणे रस्त्यावर भोलावडे गावच्या हद्दीतील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा अनुभव घेत आपल्या विद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रमुख निवडण्यासाठी डिजिटल मतदान करत निवडणूक प्रक्रिया पार पाडली यामध्ये ६०० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मतदान करत मतदानाचा हक्क बजावला. विद्यालयातील हि निवडणूक शनिवारी (दि.१२) पार पडली. यामध्ये ईव्हीएम मशीनची प्रतिकृती आणि बॅलेट पेपर न वापरता संगणकाच्या माध्यमातून मतदान अशी प्रक्रिया होती. विद्यार्थ्यांच्या चित्रासमोरील बटन माऊसद्वारे दाबून जादा वोटींग मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडण्यात आले. या निवडणूकीत शालेय विद्यार्थी प्रतिनिधी व हाऊस कॅप्टनची निवड करण्यात आली.तसेच पराभूत झालेल्या विद्यार्थ्यांना नाराज न करता इतर शाळेची जबाबदारी देण्यात आली .यासाठी इयत्ता नववीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उमेदवार म्हणून उभे होते.
विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते आणि प्रत्यक्ष मतदान कसे केले जाते , मतदान का करायचे याची समज व्हावी यासाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यामध्ये उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरणे, अर्जाची छाननी करणे, माघार घेणे, प्रचार करणे आणि प्रत्यक्ष मतदान अशा सर्व प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यात आल्या. कोणत्याही निवडणुकीत ज्या पद्धतीने वातावरण असते अगदी त्या पद्धतीने वातावरण विद्यालयात निर्माण झाले होते. यामध्ये मतदान केंद्र, मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक अधिकारी असे सर्व नियोजन करण्यात आले होते. मतदान होण्यापूर्वी उमेदवार, प्रतिनिधी, पोलिंग एजंट तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका या सर्वांच्या समक्ष मॉक टेस्ट घेण्यात आली यानंतर मतदानाला सुरुवात झाली. यावेळी शालेय शिस्तीत मतदान झाले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे, रागिणी भोसले ,अंजली समगीर यांनी या निवडणुक कार्यक्रमाचे आयोजन करत केंद्रप्रमुख अधिकारी म्हणून फिरदोस आतार, मतदान अधिकारी संतोष मादगुडे, सचिन दानवले , रवींद्र जगदाळे , किशोर गुजर, साधना जांभळे तसेच मतदान मोजणी अधिकारी दत्तात्रय महांगरे व निवृत्ती खोपडे या शिक्षक वर्गांनी काम पाहिले. मतदानाच्या वेळी मतदान कक्षाला भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन खोपडे, स्वप्निल पैलवान, किरण अंबिके, कुंदन झांजले यांनी भरारी पथक म्हणून भेट दिली.