वडतुंबी, पसुरे, बसरापुर व बारे खुर्द येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे भोर तालुका विधी सेवा समिती व ग्रामपंचायत वडतुंबी(ता.भोर) यांचे संयुक्त विद्यमाने वडतुंबी या गावी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी भोर दिवाणी न्यायालयाच्या सह दिवाणी न्यायाधीश दिप्ती सरनायक यांनी उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त कायदे विषयक मार्गदर्शन केले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या विधीज्ञ राजेंद्र सुर्या, पल्लवी शिवतरे , महिला सरपंच सुवर्णा निगडे, उपसरपंच दिप्ती जेधे, सुजाता जेधे, शाळेचे मुख्याध्यापक प्रा.वाघराळक, दिवाणी न्यायालयाचे विधी सेवा समितीचे कैलास आखाडे, जयवंत रामाने व गावातील असंख्य महिला विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.यावेळी दिवाणी न्यायालयाच्या सहदिवाणी न्यायाधीश यांनी आदर्श महिला, विद्यार्थिनी, आशा सेविका, आरोग्य सेविका, वाहक यांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला.
भोर तालुक्यातील वेळवंड खो-याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पसुरेत विद्यमान सरपंच पंकज धुमाळ व उपसरपंच आनंद सणस यांच्या उपस्थितीत महिला दिन साजरा करण्यात आला.महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला.महिलांना भेट वस्तू व फराळ वाटप करण्यात आला.
भोर शहरापासून नजिक असणाऱ्या बसरापुर(ता.भोर) याठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या नावावर घरे (मिळकती)या गृहस्वामीनी योजनेच्या घरावर लावलेल्या महिला नाम पाट्यांचे (फलक) उद्घाटन पंचायत समिती गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी गावातील महिलांना आरोग्य विषयक माहिती देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच गावच्या विद्यमान महिला सरपंच निलम झांजले यांनी आरोग्य शिबीर घेऊन महिला पुरुषाची तपासणी केली.पुणे येथील होप वेलनेस सेंटरचे जागतिक आरोग्य सल्लागार डॉ.परमेश्वर बटुळे यांनी वजन वाढल्यामुळे आरोग्यावर कोणता विपरीत परिणाम होतो,कोणते आजार जडतात हे गावातील महिला पुरुषांचे एका मशीनवर मुल्यमापन करून आजारांवर कसे नियंत्रण आपण ठेवू शकतो याचे मार्गदर्शन सोप्या भाषेत केले यावेळी गावच्या महिला ग्रामसेविका मेघा गावडे,उपसरपंच रामदास झांजले, माजी सरपंच सुर्यकांत बदक, रमेश झांजले,मोहन बदक, रामचंद्र झांजले,तेजस्विनी नितीन झांजले,शिपाई अनुराधा कुंभारकर उपस्थित होत्या.
बारे खुर्द(ता.भोर) येथे गटविकास अधिकारी धनवाडे यांनी घनकचरा व्यवस्थापन व महिला आरोग्य याविषयी सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले.आजच्या युगात घर प्रपंच व कुटुंब सांभाळूनही महिला कशा पुढे आहेत तसेच आजूबाजूला होणारा कचरा यांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले नाही तर, त्याचा पर्यावरणावर व मानवी आरोग्यावर कसा विपरीत परिणाम होतो याची माहिती त्यांनी दिली. यावेळी गावच्या महिला सरपंच, उपसरपंच, ग्रामसेविका व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.