भोर तालुक्यातील भोर -कापूरहोळ, भोर मांढरदेवी मार्गाबाबत संबंधित प्रशासनाला दिले निवेदन
भोर– तालुक्यातील भोर- कापूरव्होळ , मांढरदेव मार्गावरील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. प्रवासी नागरिकांसह शाळेतील विद्यार्थ्यांना प्रवास करताना ,चालताना मोठी अडचण होत आहे. भोलावडे येथील नीरा नदी पुलापासून बुवासाहेबवाडी जवळपास येवलीतील शेडगेवस्ती पर्यंत या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निवेदन राजा रघुनाथराव विद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेले २५०० हजार विद्यार्थी व शारदा इंग्लिश मिडियम स्कूल, भोरमधील ७३० विद्यार्थ्यांसह भोलावडेचे विद्यमान सरपंच प्रवीण जगदाळे ,तहसिलदार राजेंद्र नजन, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार ,भोर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रमोद गुजर, सचिव डॉ सुरेश गोरेगावकर,राजा रघुनाथराव विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे, विद्या प्रतिष्ठानच्या मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे पंचक्रोशीतील नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मंगळवार (दि५) भोलावडे जवळील राणी लक्ष्मीबाई पुलाजवळ रास्ता रोको करत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
या मार्गावर राजा रघुनाथराव विद्यालय व शारदा इंग्लिश मीडियम स्कूल अशी नामांकित दोन विद्यालये आहेत. या शाळांमध्ये कापूरव्होळ पासून भोर पर्यतच्या विविध गावांमधून, पंचक्रोशीतून विद्यार्थी-विद्यार्थीनी शिक्षण घेण्यासाठी येत अआहेत .कापूरव्होळ- भोर रस्त्यावरील भाटघर ते भोर या ठिकाणच्या रस्त्याचा भाग अत्यंत दुर्दशाग्रस्त झाला आहे.या रस्त्यावर खडयांचे साम्राज्य आहे. सध्याच्या पावसाळयात तर विद्यार्थ्यांना चालणेही शक्य होत नाही. खाजगी किंवा एस.टी.मधून ये-जा करीत असताना प्रचंड हाल व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे असे यावेळी विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे सांगितले, शिवाय येणा-या जाणा-या रस्त्यावरील वाहानांमुळे अंगावर चिखल उडणे, खड्डातील दगड उडुन लागणे , खराब पाणी अंगावर उडणे , छोटे मोठे वाद विवाद अशा गोष्टी घडत आहेत या सर्व गोष्टीं प्रशासनापर्यंत पोहोचव्यात हा उद्देश या रास्ता रोको आंदोलनामागे आहे. हा रस्ता मार्ग आमच्या शिक्षणाचा आधार आहे , या रस्त्यामळे शाळेसाठी होणारा उशिर, घरी परत जाताना होणारा उशीर यामुळे होत असलेले शैक्षणिक नुकसान यास जवाबदार कोण हा प्रश्न विद्यार्थी, विद्यार्थिनी,पालक ,शिक्षक, पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रशासनासमोर मांडला.
लवकर काम पूर्ण करण्याचे आश्वासन नंतर आंदोलन मागे
सदर रस्त्यालगतच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन व विद्युत तारा ,वाहिन्या स्थलांतरित करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत विद्युत वाहिन्या स्थलांतरित करणेचे काम पूर्ण झाले असून पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन स्थलांतरित करणे प्रगतीपथावर आहे तसेच दि. १५-०५-२५ पासून होणा-या मोसमी पावसामुळे सदर काम प्रलंबित आहे. सदर रस्त्याची लांबी काळ्या मातीतून असल्याने आणि सततच्या पावसामुळे पडणारे रस्तावरील खड्डे त्वरित भरून सदर लांबी वर्दळ वाहतुकीस सुस्थितीत करण्यात आली आहे. या भागातील मोसमी पाऊस कमी होताच रस्त्यालगतच्या जलवाहिन्या स्थलांतरित करून तातडीने सदर रस्त्याचे मजबुतीकरण व पुढील काम पूर्ण करण्यात येणार आहे. तरी या रस्त्याच्या कागासाठीचे आपले आंदोलन स्थगित करून प्रशासनास सहकार्य करावे असे निवेदन व आवाहन प्रशासनकडुन मिळाल्याने संबंधित आंदोलन स्थगित करण्यात आले. या दोन्ही शाळेतील शिक्षकांनी पोलिसांच्या मदतीने त्वरित रस्ता मोकळा केला. यावेळी आंदोलन स्थगित झाल्यावर विद्यार्थ्यांनीही शिस्तीचे पालन करत त्वरित शाळेत प्रवेश केला. या आंदोलनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.