खुरपणी, कोळपणी, नांगरणी करण्यात शेतकरी व्यस्त,लावणीची भात खाचरे मशागतीसाठी शेतकरी लगबगीला
भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्यासह सर्वत्र पुरेसा पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरणीसह भात तरव्यांची उगवण ही चांगली समाधानकारक झाली असून थोड्या दिवसातच भात तरवे लावणीला येणार असल्याने भात खाचरे साफ सफाई करून त्यामधील असणारी गवताची विल्हेवाट लावुन भात खाचरे लावणी योग्य करण्याच्या मशागतीसाठी शेतकरी लगबगीला आला आहे.
सध्या बरसणारा पाऊस भात तरवे, कडधान्ये पिके यासाठी पोषक अनूकुल असून त्यामुळे कडधान्यां पिकासह भात तरवे जोमाने आले आहेत. कडधान्ये पिकांमध्ये प्रामुख्याने भूईमूग, सोयाबीन,घेवडा, चवळी, मूग,उडीद , तीळ,पावटा यांचा समावेश आहे. भात तरव्यांमध्ये प्रामुख्याने महाबीजचे इंद्रायणी, कर्नाटकी इंद्रायणी, तसेच इतरही कंपन्यांचे इंद्रायणी ,रत्नागिरी चोवीस,कोळंबा, बासमती ,कोलम, आंबेमोहोर अशा अनेक नव नवीन भात वाणांचा समावेश आहे. या पीकांची, तरव्यांची उगवण चांगली झाल्याने ही पीके बेननी,खुरपणी, कोळपणी करण्यात या परिसरातील शेतकरी व्यस्त आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात पिकांसाठी आवश्यक, उपयुक्त असणारे ऊन्ह , पाऊस हे दोन्ही समाधानकारक असल्याचे या भागातील शेतकरी बैलजोडी मालक अजित शिवाजी साळुंके यांनी सांगितले.