रात्री अपरात्री मद्यपिंसह कॉलेजच्या प्रेमीयुगुलांचे वाढले प्रमाण, स्थानिकांसह महिलांना होतेय दमदाटी
भोर शहरापासून दोन किलो मीटर अंतरावर पर्यटन स्थळ असलेल्या बसरापुर या ठिकाणी दोन दिवसापूर्वी झालेल्या ग्रामसभेत रात्री सात ते सकाळी सात पर्यंत बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना फिरण्यासाठी बंदी करण्याचा ठराव एकमताने पास करत त्यासंबंधीचे निवेदन व ठराव, पोलीस पाटील अहवाल तहसीलदार सचिन पाटील व भोरचे पोलीस निरीक्षक आण्णा पवार यांना देण्यात आले. यावेळी या गावच्या विद्यमान महिला सरपंच नीलम झांजले उपसरपंच रामदास झांजले पोलीस पाटील विठ्ठल झांजले व ग्रामस्थ उपस्थित होते.
सद्यस्थितीला या ठिकाणच्या वेळवंडी नदीची पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे या नदीच्या सभोवतालचा परिसर मोकळा झाला आहे .हा परिसर स्वच्छ व निसर्गरम्य असल्याने पर्यटकांची भलतीच गर्दी असते. शनिवारी, रविवारी आणि सरकारी सुट्टी दिवशी या भागात फिरणारे पर्यटक, फोटो शुटवाले, लग्न, साखरपुडा प्रिवेडींग शूटिंगवाले, मद्यपी पार्टी करणारे ,धूर काढणारे हौसी कार्यकर्ते, प्रेमीयुगुल तरुण -तरुणी, सेल्फी काढणारे असे अनेकजण धरणाचा बॅक वॉटर ,उगवता, मावळता सुर्य पाहण्यासाठी या परिसरात मोठ्या प्रमाणात येत आहेत. तसेच सकाळी, दुपारी पोहण्याचा आनंद लुटणा-यांची संख्या देखील वाढत चालली आहे. धरणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकांना आपल्या जीवास देखील मुकावे लागले आहे. रात्री- अपरात्री,उशिरा बेधुंदपणे मद्यपी पार्टी करणा-यांचे प्रमाण तर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अनेक ग्रामस्थ महिलांना मद्यधुंद असणाऱ्या पर्यटकांचा मोठा त्रास होत आहे. अनेक जण भांडण तंटा करून दमदाटी करून भरगाव वेगाने वाहने घेऊन जात आहेत . प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली असल्याने पुढे भविष्यातील धोका लक्षात घेता व कोणताही बेकायदेशीर अनुचित प्रकार घडू नये म्हणून रात्री सात ते सकाळी सात पर्यंत या नदीच्या किनाऱ्यावर फिरायला व गावच्या हद्दीतील मागील रस्त्यावरून रात्री सात नंतर नदीला जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असल्याचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांनी सांगितले.
ग्रामस्थांचा ठराव व निवेदन प्राप्त झाले असून पोलीस स्टेशनचा अहवाल मागितला आहे. नागरिकांना पर्यटकांच्या होणाऱ्या नाहक त्रासापासून सोडविण्यासाठी वरीष्ठ पातळीवर अहवाल पाठवुन योग्य ती कारवाई केली जाईल.”सचिन पाटील – तहसीलदार भोर”
या नदीकिनारी आमची दिवसा व रात्रीची गस्तीची गाडी नेहमी फिरत असते कित्येक वेळा अनेकांना आम्ही या ठिकाणाहुन पिटवुन लावले आहे ग्रामस्थांचे निवेदन व पोलीस पाटलांचा अहवाल मिळाला असून पुढे वरीष्ठ पातळीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.”अण्णा पवार – पोलीस निरीक्षक भोर पोलीस स्टेशन”