भोर : बालवडी (ता.भोर) येथील उच्च शिक्षित, प्रयोगशील युवा शेतकरी स्वाती अमित किंद्रे यांनी नाटंबी येथे सन २०१९ साली ७० गुंठे जागा खरेदी करून त्यामधील ३० गुंठे क्षेत्रामध्ये बॅक ऑफ इंडिया भोर शाखेच्या अर्थ सहाय्याने पॉलिहाऊस उभारून पारंपरिक शेतीला बगल देत पॉलीहाउस उभारून जरबेराचा मळा फुलविला आहे. या शेतीमधून दररोज फुलांच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळत आहे.स्वाती किंद्रे यांनी शेतकऱ्यांसमोर चांगला आदर्श निर्माण केला आहे.भाताची शेती म्हणून ख्याती असलेल्या या परिसरात रासायनिक खते, औषधे, योग्य तण नियंत्रण,पाणी व्यवस्थापन, बुरशीनाशक आणि किड नियंत्रण,सेंद्रिय जिवाणू खताचा वापर करून नैसर्गिक पध्दतीने जरबेरा या नगदी पिकाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.पूर्व मशागतीमधे लाल माती, दीड टन भाताची तुस,२० ट्राॅली शेणखत मिसळले. ट्रॅक्टरने नांगरट करून रोटर मारला पाणी सोडण्यात आले.त्यानंतर बेड तयार करण्यात आले.
राईस अन शाईन कंपनीचे १८ हजार रोपांची लागवड केली.बेसल डोस मध्ये सिंगल
सुपर फॉस्पेट – १५ बॅग, निंबोळी पेंड ३० बॅग,स्टरामील ८ बॅग,बायोझॅम ग्रॅन्यूलस ३० किलो ,थायमेट १५ किलो,मायक्रो न्यूट्रीयन १५ किलो, सल्फर ३० किलो,ह्युमीक दाणेदार ३० किलो,यारामील काॅमव्लेस ३० किलोचा दिला. शेतीच्या मशागतीनंतर ७५ सेंमी रुंदीचे ३०सेमी ते ४५ सेंमी उंचीचे गादी वाफे तयार करून त्यावर दोन रोपात ३० सेमी तर दोन ओळीत १० सेमी अंतर ठेवून झिकझ्याक पध्दतीने १५ ऑगस्ट २०२१ ला लागवड केली. ठिबक सिंचनाद्वारे आठवड्यातून दोन वेळा अर्धा किलो प्रमाणे ००.००.५०,००.५२ .३४,१९.१९.१९,१३.००.४५, कॅल्शियम , मिकझाॅल डी,फरसीम,लीब्रा,९०९ या खंताची मात्रा दिली जाते.
५० दिवसानंतर जरबेराच्या रोपाला कळी येण्यास सुरुवात झाली. रोपांची वाढ होण्याकरिता कळ्या खुडून टाकल्या.१२ आठवड्यांनी पहिली फुले काढणीस सुरुवात केली. सकाळी फुलांची काढणी करुन काढलेली फुले स्वच्छ पाणी असलेल्या बादलीमध्ये ठेवून १० फुलाचा एक गठ्ठा याप्रमाणे गठ्ठे बनवून पुणे मार्केटला विक्री पाठवले जातात.आठवड्यातून दोन वेळा कीटक आणि रोग नियंत्रणासाठी विविध कीटकनाशके आणि बुरशीनाशक व टॉनीकचा वापर केला.किड नियंत्रण ठेवण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा २०० मिली प्रमाणे ओमाईट,पेगासेस,निमझाॅल, स्टिकर,रोगर, इंडेक्स,बायो ३०३, सल्फर, ओबेरॉन,कुनोची या किड नियंत्रकाचा वापर केला.
ठिबकने पाणी दिले जात असल्याने बेडचा पृष्ठभाग कठिण होतो त्यामुळे रोपाच्या मुळांना खत व हवा मिळणे अवघड जाते तसेच तण नियंत्रणासाठी खुरपणी दर पंधरा दिवसांनी केली जाते.फुलदांड्याच्या लांबी,दांड्याची जाडी, फुलाचा आकार, ताजेतवाने पणा यावर प्रतवारी ठरते.त्यामुळे प्रतवारी करताना विशेष काळजी घ्यावी लागते त्या नूसार दर ठरतो त्यामुळे प्रतवारीची फुले निवडुन गड्डी तयार करावी लागते एक फुल जरी खराब असेल तर त्याचा दरावर परिणाम होतो.
जरबेराची फुले रोज ३०० गड्डी पुणे मार्केट पाठवली जाते.साधरणता २० रुपयांपासून ९० रुपयांपर्यंत गड्डीला भाव मिळतो . शेतीची आवड असल्याने पारंपारिक शेती न करता आधुनिक शेतीकडे लक्ष केंद्रीत केले.त्यांचे पती श्री अमित ज्ञानेश्वर किंद्रे हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काम करत असून त्यांच्या पाठिंबाानेच हे स्वप्न पूर्ण केले.
स्वाती किंद्रे, प्रयोगशील शेतकरी बालवडी (ता.भोर)