भोर पोलीसांचे घाबरून न जाण्याचे आवाहन, पोलीस पाटलांना घेऊन रात्रीची गस्त
भोर तालुक्यात सध्या रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोनने उच्छाद मांडला असून तालुक्यात सर्वत्र फिरणारा ड्रोन आता वेळवंड खोऱ्यात, महुडे खो-यात,धरण परिसरात घिरट्या मारू लागला आहे असे नागरिकांकडून सांगण्यात आले.
मागील चार दिवसांपासून भोर शहरासह, भोलावडे , किवत , गवडी, शिंद, नांद,महूडे, सांगवी, येवली ,भाटघर, बसरापुर, बारे, म्हाळवडी अशा भाटघर धरण परिसरातील व वेळवंड, महुडे खो-यातील गावावरून रात्रीच्या वेळी ड्रोन प्रवास करताना आढळला. त्यामुळे नागरिकांमध्ये ड्रोन विषयी भीतीचे वातावरण पसरले असून ड्रोनची दहशत निर्माण झाली आहे. हे ड्रोन चोरीच्या उद्देशाने, टेहळणी, रेकीसाठी ,की पोलिसांना नाहक त्रास देण्यासाठी नक्की कशासाठी उडवले जात आहेत याची उकल होणे गरजेचे आहे असे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. संबंधित ड्रोनबाबत भोर पोलीस स्टेशनने घाबरून न जाण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. पोलीस यंत्रणा रात्रीच्या वेळी गावच्या पोलीस पाटलांसमवेत घेऊन गस्त घालत असून हे ड्रोन नक्की कोठून येत आहेत, कशासाठी येत आहेत याचा तपास पोलीस करत आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
तालुक्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये लवकरच या ड्रोनचा वेध घेण्यासाठी ॲन्टीड्रोन गन पोलीसांना दिली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे व वरिष्ठांकडे पाठवला असून त्याबाबत लवकर कारवाई होणार आहे. गावच्या पोलीस पाटलांना सतर्क राहून , गस्तीचे आवाहन केले आहे.”
अण्णासाहेब पवार – पोलीस निरीक्षक भोर.पो.स्टे.