पावसाचा जोर कायम, शेतकरी वर्गात समाधान, रखडलेल्या भात लावण्या वेगाने
वेळवंड खोऱ्यासह , भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सद्यस्थितीला धरणात ५८ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षी यावेळेस ३८ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध होता. तर निरा देवघर धरणात सद्यस्थितीला ५० एवढा पाणीसाठा उपलब्ध असून गतवर्षी या दिवशी ४० टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध होता.
भाटघर धरण परिसरात गेल्या २४ तासात ३२ मि.मी. पावसाची नोंद झाली असून १ जून पासून ४०२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर निरा देवघर पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात ३८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून १ जून पासून ५७४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
दरवर्षीच्या तुलनेने यावर्षी उशिरा पाऊस सुरू झाला असला तरी भात लागणीसाठी पाऊस समाधानकारक आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, चवळी, भुईमूग, मूग,घेवडा ,उडिद या पिकांनाही पोषक वातावरण तयार झाले असून ही पिके तरारली आहेत. यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करीत आहे. मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर मंदावला होता.त्यामुळे काही ठिकाणच्या भात लावण्या रखडल्या होत्या. परंतु दोन दिवसांपासून तालुक्यात सर्वत्रच मुसळधार पावसाच्या सरीवर सरी कोसळत असल्याने दोन्ही धरण पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे व रखडलेल्या शेतकऱ्यांच्या भात लावण्या देखील जोमाने सुरू झाल्या आहेत. असाच जर पाऊस सुरू राहिला तर भाटघर धरण लवकरात लवकर भरले जाणार असुन पिण्याच्या पाण्यासह , शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे असे या भागातील शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले