भोर – भोर मांढरदेवी रस्त्यावरील नेरे या गावामध्ये ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे उपकेंद्र रुग्णालय आहे . आजुबाजुच्या परिसरातुन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रुग्ण उपचारासाठी येतात परंतु येताना जाताना या ठिकाणी जाण्यासाठीचा रस्ता निकृष्टमय , चिखलाचा निसरडा झाला आहे.त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच अनेक जण या रस्त्यावरून घसरून पडल्यामुळे जखमी होत आहेत.
भोर तालुक्यात मे च्या मध्यापासूनच पाऊस सुरू झाला असुन आजपर्यंत न थांबता पावसाची संततधार सुरू आहे.या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने या भागातील रस्ते खड्डे , खराब , निकृष्ट झाले आहेत. खड्यात पाणी साचल्याने, चिखलाचा निसरडा रस्ता झाल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरत वातावरण प्रदूषित होऊन लोकांच्या आजारपणात वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे .
नेरे येथील ग्रामीण रुग्णालय उपकेंद्रात रुग्णांवर उपचार चांगले होतात. त्यामुळे परिसरातील जेष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, अबाल वृद्ध रूग्णांची या रुग्णालयात कायमच वर्दळ असते. पण या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता दगड, माती, आणि प्रचंड चिखल दलदलीचा खड्डेमय निसरडा झाला असून धोकादायक असल्याचे रुग्णांकडून सांगण्यात आले आहे. या रस्त्यावरून दुचाकीवरूनही रुग्ण दवाखान्यापर्यंत नेऊ शकत नाही. उपचारासाठी आलेले पाय घसरून पडुन रुग्णच जखमी होत असल्याचे रुग्णांनी सांगितले . संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या ठिकाणच्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी या भागातील रूग्णांनी व नागरिकांनी मागणी केली आहे.