भोरः लोकनेते संपतराव अण्णा जेधे यांच्या जयंती निमित्ताने १९७६ सालची आठवण ताजी झाली आहे. त्यावेळी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे होते. त्यांच्याच शुभहस्ते भोरेश्वर सहकारी औद्योगिक वसाहतीचे उद्घाटन करण्यात आले होते. भोरेश्वर औद्योगिक वसाहताची त्यावेळी मूहूर्तमेढ रोवण्यात आली होती. मात्र, काही कारणांमुळे नावारुपाला आलेले अनेक छोटे मोठे कारखाने बंद पडले. वराल फोटोमध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते मोठ्या धामधुमात या औद्योगिक वसाहतीचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाप्रसंगी भोर नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष अमृत रावळ, लोकनेते संपतराव जेधे, आप्पा साहेब शिवतारे, दिनकरराव धाडवे पाटील, रामनाना सोनवणे व मुख्य अधिकारी सुभाष धाराशिवकर व इतर मान्यवर यांनी भोरेश्वर औद्योगिक वसाहतीची मुहूर्त मेढ रोवली.
त्यानंतर कित्येक कारखाने जसा जसा काळ पुढे सरकत गेला. तशी बंद झाली. यामध्ये आरलैब्ज, भोर इंडस्ट्रीज, आर्ट लेदर, यशवंत सहकारी, महाउर्जा अशा अनेक छोट्या मोठ्या प्रकल्पांचा समावेश होता. तसे पाहिले तर त्यावेळी या उद्योगांना चांगला प्रतिसाद मिळून ती नावारुपाला आली. त्यानंतर जी बंद पडली ती आजतागायत दुसरा कोणताच प्रकल्प, उद्योगधंदे, औद्योगिक वसाहत उभी राहिली नाही. या घटनेला आता ४८ वर्ष पूर्ण होत आहेत. भोर तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एकही कारखाना, प्रकल्प, औद्योगिक वसाहत MIDC, मिनी MIDC आली नाही. परिणामी भोर तालुक्यातील युवा वर्ग रोजगाराच्यासाठी आजही वणवण भटकत आहे, ही भोर तालुक्यातील युवा वर्गावर आलेली दयनीय अवस्था आहे. आजही या बाबतीत कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना कृतीत आणण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून शास्वत प्रयत्न केले गेलेले नाहीत. त्यामुळे भोर तालुका आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या पिचलेल्या अवस्थेमध्ये दिवसेंदिवस खोल गर्तेत सापडलेला आहे. असे असताना भोर तालुक्यातील पुढारी मात्र स्वतःच्या पोळी ओरबाडून घेताना दिसतात. आजही भोर तालुक्यातील बळीराजा युवा वर्ग उपाशी व नेते मंडळी तुपाशी अशी अवस्था आहे. हेच तालुक्याचे दुर्देव.