भोर, (पुणे) : भोर नगरपरिषदेने प्रशासकीय इमारतीचा विस्तार करण्याचे योजले आहे. तसे झाल्यास अनेक मत्स्य व्यावसायिकांचा व्यवसाय बुडून आर्थिक नुकसान होऊ शकते, तरी याबाबत योग्य तो तोडगा काढून गोरगरीब व्यावसायिकांना दिलासा मिळवून द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना सुळे यांनी याबाबत पत्र लिहिले असून संबंधित मत्स्य व्यावसायिकांचे उत्पन्नाचे साधन टिकायला हवे, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.
भोर येथील संबंधित जागेवर ते व्यवसायिक गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत. त्याच जागेवर भोर नगर परिषदेने वाढीव प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्याचे नियोजन केले आहे. (Bhor News) परिणामी त्या व्यवसायिकांच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या व्यावसायिकांचे उत्पन्नाचे साधन मासे विक्री हाच असून ती जागा गेली तर मासे विक्री करण्यासाठी जागा नसल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. येथील व्यावसायिकांच्या प्रतिनिधीनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन मदत करण्याबाबत विनंती केली होती. त्यावर सुळे यांनी तत्काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे भोर तालुका पदाधिकारी विठ्ठल शिंदे आणि यशवंत डाळ यांना सूचना देऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेण्यास सांगितले.